
>> दीपाली दातार
अंतस्वराची, जाणीवनिष्ठ, आत्मनिष्ठ कविता लिहिणाऱया मोजक्या कवींच्या यादीतले ‘हेमकिरण पत्की’ हे मराठी साहित्यविश्वातील महत्त्वाचे कवी आहेत. ‘पाऊसफुले’, ‘एकांतवाटेने’, ‘शाई आकाशाची’, ‘कवडसे कोवळ्या उन्हाचे’ या कवितासंग्रहांनंतर ‘या तहानेला तळ नाही’ हा पाचवा संग्रह नुकताच ‘सृजनसंवाद’ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर या कविमनाला मूर्त अनुभवातलं अमूर्त शोधण्याची, अबोध मनाचा अव्यक्त पैस जाणून घेण्याची गहिरी तहान लागली आहे. कवितासंग्रहाच्या शीर्षकातून आपल्या मनाच्या या अवस्थेचं सूचन कवीनं नेमकेपणानं केलं आहे. सभोवताली घटना घडतात, त्याचे साद-पडसाद मनावर उमटून आपण सर्वच जण व्यक्त होत असतो; पण या कवीचं वेगळेपण हे की, तो आपल्या मनाच्या पातळीवर घडणाऱया घटनांचेही त्रयस्थपणे अवलोकन करतो. तो लिहितो-
“ही कसली आठवण
ज्यात मेळ-दुराव्याचा
ऊनपाऊस नाही;
एक लांबलचक संगतीच आहे :
शरीर-मनाच्या दोनपणापलीकडली
जाणिवांच्या पलीकडला सूक्ष्म प्रदेश कवेत घेण्याचा कवीचा हा प्रवास मोठय़ा अवघड वळणवाटांचा. रित्या डोळ्यांनी आकाश पाहताना निळ्या झालेल्या डोळ्यांत त्याला असंख्य डोळ्यांचं ढग असलेलं, ढग नसलेलं आकाश प्रतिबिंबित झालेलं दिसतं.
रित्या डोळ्यांचं रितेपण संपत नाही
आणि आकाशाचं आकाशपणही.
पाहणं मात्र केवळ निळं असत नाही.” ‘काहीच पाहत नसतानाही’ या कवितेतही गात्रांच्या चारुतेपल्याडचा अर्थ त्याच्या दृष्टीत उतरतो. हे असले अनुभव घेण्याकरिता आवश्यक असलेलं मनाचं प्रचंड स्वस्थपण, निवांतपण आजच्या धकाधकीच्या, उत्सवी, आवाजी वातावरणातही कमालीच्या अंतस्थ ताकदीने या कवीने जोपासलं आहे. म्हणूनच त्याला शांततेचा अगदी जगावेगळा अर्थ उमगतो.
“निजलेलं गाव, नदीचं कोरडं पात्र
म्हणजे नसते शांतता…
शांतता असते :
शब्द विसर्जित झाल्यानंतरचं
रितं रितं मन; मनापलीकडचं मोहन.”
अशा शांत मनाला साहजिकच स्वतच्या हृदयाच्या आरशात, लिप्ताळ्यात हरवलेली आपलीच प्रतिमा आरपार पाहता येते, बंद असलेल्या घराच्या दाराशी होणारी पहाटवाऱयाची कुजबुजही ऐकू येते आणि तिचं पाऊल न वाजवता परतणंही दिसतं. कवीच्या भावप्रवासातले हे अनुभव जसे धूसर, तरल तशाच त्याच्या कवितादेखील. आपल्या ऐंद्रिय संवेदनांना धार लावणारी, सूक्ष्म करणारी ही कविता आणखी कशी आहे, तर नादमय आणि चित्रमय. कवितेची व्याख्या करणारे ‘नाद-चित्राचे रुपडे’ हे ज्ञानदेव माऊलींचे शब्द पत्कींच्या कवितेत सार्थ होताना दिसतात. ‘हा कसला पाऊस?’, ‘सांजवेळ’ यांसारख्या अनेक कवितांत त्याचे यथार्थ दर्शन होते.
“झाडं फुलांत येतात
आणि फुलं दृष्टीत.
बघता-बघता आपण झाड होतो,
काळाची भूमी नसलेलं.”
कालसापेक्ष मर्यादांच्या पार जाता यावं हीच ती मनापलीकडली तहान. अव्यक्त धुक्याच्या या गावशिल्पात कवी एकांतवाटेने निघाला आहे. हे गाव तरी खरे आहे की तोही भासच? अशी कधी कधी कवीची अवस्था होऊन गेलेली आहे, पण अज्ञाताला कवेत घेण्याची ही मृगजळी ओढ कवीला सतत प्रवासत ठेवते. मनाचा अंतर्मनाबरोबरचा लपंडाव सुरूच राहतो. अंधार-उजेडाच्या खेळात पावलापुरता प्रकाश पुरतो त्याला कधी, पण काही वेळा वाटतं,
“ओळींतल्या दोन शब्दांमधलं अवकाश,
पोहचेल ना तुझ्यापर्यंत,
शब्दांनी विचारांचा आकार घेताना?”
नाजुक, भावनाशील मनाला होणाऱया वेदनांची जातकुळीही अगदी वेगळी असते. आपण एकमेकांच्या बरोबर असूनही एकमेकांचे होऊ न शकण्याचं दुःख त्याला सारखं बोचत राहतं. एका उत्कट संवादी मनोवस्थेतून चिंतन घडताना त्याला प्रश्नही पडतात की,
“आपल्या काळजातील सल
दुसऱयाला सांगितली तर हलका होतो का प्राण?”
शेवटी साच, निर्मल असं काही पाहण्याची आसही संपत जाऊन, मौनाचा उजेड घेऊन अव्यक्तात केवळ उरण्याची इच्छा त्याच्या उरात जागी होते. गुंतूनही मोकळ्या, अलिप्त राहणाऱया ईशतत्त्वाचंच होऊन रहावं असं ‘हृद्गत‘ त्याच्या ओठी येतं.
मळवाट नाकारणारी, गर्दीत राहूनही स्वतकडे परत येणारी निकोप संवेदनेची आशयगर्भ कविता या संग्रहात आपल्याला भेटत राहते. या कविता वाचताना कवीच्या उन्नत मनाचं दर्शन घडल्याने उच्च प्रतीचं आध्यात्मिक समाधान आपल्याला मिळत राहतं आणि त्यातच आपला जीव अक्षरश गुंतून पडतो. संग्रहाच्या शीर्षकाला साजेसं शिरीष घाटे यांचं मुखपृष्ठ, स्वत कवी हेमकिरण पत्की यांची अर्थपूर्ण रेखाटनं, कवितेला पूरक अशी जे. कृष्णमूर्ती यांची काही ठिकाणी दिलेली अवतरणं आणि कविवर्य द. भा. धमणस्करांची भावपूर्ण पाठराखण याने हा संग्रह नितांतसुंदर, श्रीमंत झाला आहे.
या तहानेला तळ नाही (कवितासंग्रह)
कवी : हेमकिरण पत्की
प्रकाशक : सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठे : 80, मूल्य : 200 रुपये



























































