
पापांचा खेळ पाहून मीही बॅडमिंटन खेळू लागले. परंतु केवळ हौस म्हणून खेळू नको, खेळाच्या मैदानात सतत पुढे जात राहा, असे त्यांनी मला सांगितले. पापांचे हे म्हणणे मी गंभीरपणे घेतले. परंतु नंतर जेव्हा मी मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा पापांनी मला साथ दिली. मी जर अभिनेत्री बनले नसते, तर मात्र मी निश्चितच एक चांगली बॅडमिंटन खेळाडू बनले असते. आज मी मोठी झाली आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. पण प्रत्येक वेळी माझ्याकडे पाहताना त्यांच्या चेहऱयावर जी आनंदाची आणि अभिमानाची भावना दिसते, ती शब्दांत व्यक्त करणे मला शक्यच नाही.
सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलांचे बालपण जसे असते, तसेच माझेही होते. माझे पापा खूप प्रसिद्ध व्यक्ती होते; पण ते बहुचर्चित व्यक्तिमत्त्व आहेत हे मला थोडी मोठी झाल्यावरच समजले. सामान्यतः आई मुलांबरोबर सर्वाधिक वेळ व्यतीत करते; परंतु आम्हा दोघी बहिणींसोबत पापा जास्तीत जास्त वेळ व्यतीत करीत असत. माझ्याशी किंवा माझ्या बहिणीशी ते कधीही रागावून बोलले नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांच्या इच्छेविरुद्ध जेव्हा मी काही निर्णय घेतले, तेव्हाही ते नाराज झाले नाहीत. वस्तुतः समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्याखेरीज प्रतिक्रिया द्यायची नव्हती, हा त्यांचा शिरस्ता होता. अर्थात मला काहीही करायची मोकळीक होती, असा याचा अर्थ नक्कीच नाही. लहानपणी जेव्हा मी चुका करीत असे, तेव्हा पापा मला एका खोलीत कोंडून ठेवत असत. पापांचा खेळ पाहून जेव्हा मीही बॅडमिंटन खेळू लागले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, केवळ हौस म्हणून खेळू नको. खेळाच्या मैदानात सतत पुढेच जात राहा. मी त्यांचे म्हणणे ऐकले आणि गंभीरपणे बॅडमिंटन खेळू लागले. जर मी अभिनेत्री बनले नसते तर मात्र मी निश्चितच एक चांगली बॅडमिंटन खेळाडू बनले असते. माझ्या शिक्षणाच्या बाबतीतही पापा अत्यंत जागरूक राहत असत. अभ्यासात येणाऱया अडीअडचणी जाणून घेऊन ते अत्यंत संवेदनशीलपणे मला अनेक बाबी समजून सांगत असत. शिक्षण अपूर्ण ठेवून जेव्हा मी मॉडेलिंग करण्याचा विचार केला तेव्हा पापा त्यासाठी तयार झाले नाहीत. ज्या क्षेत्रात भविष्य निश्चित नाही, अशा क्षेत्रासाठी शिक्षण अपूर्ण ठेवणे योग्य नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे मी आधी शिक्षण पूर्ण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. कोणत्याही सजग पित्याने हाच निर्णय घेतला असता. परंतु जेव्हा मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले तेव्हा मात्र त्यांनी मला संमती दिली.
वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी घरापासून दूर मुंबईला राहून मॉडेलिंग आणि चित्रपटाच्या क्षेत्रात मी संघर्ष करू शकले आणि अखेर त्यात यशही मिळवलं, हा पापांनी केलेल्या संस्कारांचाच परिणाम होय. पापांनी मला ज्या पद्धतीने लहानाचे मोठे केले त्यामुळेच माझ्यात आत्मविश्वास आला. मुंबईत एकटे राहण्यात अडचणी येत असतील तर मी तुझ्याबरोबर राहण्यास येतो असेही ते मला कधी म्हणाले नाहीत. माझा मार्ग मी स्वतःच शोधेन यावर त्यांचा विश्वास होता. परंतु माझी खुशाली मात्र ते कायम विचारत राहिले. मला सल्ला देत राहिले. ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जो विवाद निर्माण झाला होता त्या वेळी माझ्या सुरक्षिततेची त्यांना खूपच काळजी वाटत होती. मी तुझ्यासोबत मुंबईला राहायला येऊ का, हा प्रश्न त्या वेळी पापांनी मला सर्वप्रथम विचारला. जेवढा विश्वास पापांनी माझ्यावर दाखवला तेवढाच विश्वास आता मी त्यांच्या निर्णयांवर ठेवते. कामाच्या बाबतीत पापा आणि मम्मी या दोघांनाही मी विश्वासात घेते. मी खूप कमी वयात बरेच काही मिळवू शकले; परंतु मी माझ्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवू शकत नाही हीच या यशाची मी मोजलेली किंमत आहे.
आता जेव्हा पापांच्या सोबत वेळ घालवते, तो माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण असतो. त्यासाठी मी बंगळुरूला जाणे हाच चांगला मार्ग असतो. ज्या-ज्या वेळी मी घरी जाते त्या-त्या वेळी पापा मला रिसिव्ह करायला विमानतळावर येतात. विमानतळावरून आमच्या घराचे अंतर सुमारे 45 मिनिटांचे आहे. या कालावधीत गाडीत मी आणि पापा दोघेच असतो आणि आम्ही मनसोक्त गप्पा मारतो. घरी पोहोचल्यावरसुद्धा पापा सगळी कामे बाजूला ठेवून माझ्यासोबत अधिकाधिक वेळ व्यतीत करतात. “आमची मुलगी एवढी मोठी झाली यावर आमचा विश्वासच बसत नाही,’’ असे मधूनमधून ते जेव्हा हसत-हसत म्हणतात, तेव्हा माझ्याकडचे सगळे शब्द संपून जातात आणि डोळ्यात केवळ आनंदाश्रू उरतात. प्रत्येक वेळी माझ्याकडे पाहताना त्यांच्या चेहऱयावर जी आनंदाची आणि अभिमानाची भावना दिसते, ती शब्दांत व्यक्त करणे मला शक्यच नाही. पापा खूप लाजाळू स्वभावाचे आहेत. अगदी मोजक्या लोकांशीच ते खुलेपणाने बोलतात. एकेकाळी पापा माधुरी दीक्षितचे खूप मोठे चाहते होते. एके दिवशी पापांचे हे गुपित मी सार्वजनिक केले आणि एका कार्यक्रमात ही गोष्ट मी माधुरीजींनाही सांगितली. आताही मी जेव्हा माधुरीजींचा विषय पापांजवळ काढते तेव्हा ते खूप हसतात. माझ्या पापांसारखे वडील प्रत्येक मुलीला लाभावेत असेच मला मनापासून वाटते.
(शब्दांकन : अनुश्री जोशी)



























































