
>> नवनाथ शिंदे
राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांकडून वैयक्तिक चिखलफेकीचा प्रकार वाढीस लागला आहे. विशेषतः सोशल नेटीझन्सकडून टीका करण्याची नैतिकता घसरल्यामुळे सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मागील काही महिन्यांपासून फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर बदनामीचे प्रकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राजकीय वैरासोबत वैयक्तिक दुश्मनीचा आलेखही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
राजकीय मतभेदातून होणारी टीका आणि त्यानंतर कार्यकर्त्यांकडून होणारी वैयक्तिक चिखलफेक चिंतेची बाब ठरत आहे. प्रामुख्याने सोशल मिडीयावर नेत्यांची छायाचित्रे क्रॉप करून वापरणे, व्हिडीओ एडीट करून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटरवर अपलोड करणे, पदसिद्ध नेत्यांच्या फोटोवर आक्षेपार्ह लिखाण करणे यासारख्या घटनांमुळे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मागील काही महिन्यांत विविध राजकीय पक्षांची बदनामी केल्याप्रकरणी जवळपास 100 पेक्षा जास्त जणांवर आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडीयावर मत व्यक्त करताना आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मिडीयावर मत व्यक्त करणाऱ्या तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. प्रत्येकजण आपआपल्या आवडत्या राजकीय नेत्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अलीकडील काळात टीका करताना तरूणांकडून मर्यादा ओलांडली जात आहे. त्यामुळे टीका करताना नैतिकचे भान न ठेवता पोस्टमध्ये अश्लील कमेंट करणे, फोटो मॉर्फ करून टाकणे, महिलांबाबत अतिशय खालच्या स्तराला जाऊन मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे नेत्याची बाजू सोशल मिडीयावर मांडताना तरुणांकडून गुन्हे घडत असल्याचे दिसून येत आहे. पातळी सोडून टीका केल्यामुळे वैयक्तिक वादाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे एकमेकांवरील राग आणि द्वेष व्यक्त करण्यासाठी थेट हाणामारीपर्यंतचे प्रकार घडले आहेत. सामाजिक भान राखत प्रत्येकाने सभ्य भाषेत आपले विचार मांडले तर काही गुन्ह्याचे प्रमाण कमी होणार आहे. मात्र, सध्या सोशल मिडीयाचा वापर फक्त शाब्दिक टीकांसाठी केला जात आहे. त्यानुसार विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील वाद विकोपाला जात असल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्यक्त होताना अनेकांकडून परिणामांचा विचार केला जात नाही. त्यानंतर होणारे वादविवाद, भांडण, दोन्ही पक्षातील वैचारिक मतभेद टोकाला जात असल्याचेही दिसून आले आहे. विशेषतः टेक्नोसॅव्ही तरूणांकडून सामाजिक भान राखत ऑनलाईन शिक्षणाचा फायदा इतरांना होईल, याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. मात्र, अत्याधुनिक साधनांचा वापर करताना भान बाळगले जात नाही. त्यामुळे सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी नोकरी, परदेशातील संधी यावर अनेकांना पाणी सोडावे लागत आहे. किरकोळ कारणातून होणारे वाद थांबविल्यास दूरगामी परिणाम भोगावे लागणार नाहीत. त्यामुळे राजकीय द्वेषापोटी सोशल मिडीयावरील चिखलफेक थांबणे गरजेचे आहे.
सोशल मिडीयाद्वारे टीका-टिप्पणीतून तरूणांकडून वैयक्तिक मत व्यक्त केले जात आहे. मात्र, टीका करण्याची पातळी आणि शब्दातील आक्षेपार्हपणा वाढीस लागला आहे. त्यामुळे तरूणांवर गुन्हेही दाखल होत आहे. त्यामुळे तरुणांचे असे वर्तन चिंताजनक आहे. सोशल मिडीयाचा वापर करताना नैतिकता बाळगून व्यक्त होणे गरजेचे आहे.
– भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर विभाग, पुणे




























































