
उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये एक आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. मारहाण, शिवीगाळ, फसवणूक यासारख्या प्रकरणी तक्रार दाखल करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, देहरादूनमध्ये एका पौरोहित्य करणाऱ्या भटजींनी सलूनचालकाविरोधात एका वेगळ्याच कारणासाठी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तक्रारीची दखल घेत सलूनचालकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
देहरादूनमध्ये पौरोहित्याचे काम करणारे शिवांनद कोटनाला रविवारी नवादातील भावेश जेंट्स सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेले होते. सलूनवाल्याने केस कापताना त्यांची शेंडीही कापून टाकली. घरी गेल्यावर शिवंनद यांना न्हाव्याने आपली शेंडी कापल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाच्या भरात ते सलून चालकाकडे गेले आणि सलूनचालकाशी त्यांनी वादावादी करायला सुरुवात केली.
शिवांनद यांचा चढलेला पारा आणि त्यांची आक्रमकता बघत सलूनचालकाने झालेल्या चुकीबाबत माफीही मागितली. मात्र, शिवांनद यांचा राग शांत झाला नाही. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत सलूनचालकाविरोधात तक्रार दाखल केली. वादावादी वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सलूनचालकाविरोधात एफआयआर दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
शिवांनद रविवारी भावेश जेंट्स सलूनमध्ये केस कापायला गेले होते. केस कापून झाल्यावर त्यांनी केसांना कलपही करून घेतला. घरी गेल्यावर केसांचा रंग सुकल्यावर ते आंघोळीसाठी गेले. त्यावेळी आपली शेंडी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सलूनवाल्याने शेंडीच कापल्याने शिवांनद यांचा रागाचा पारा चढला. ते पुन्हा सलूनमध्ये गेले आणि सलूनवाल्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. झालेल्या चुकीबाबत सलूनवाल्याने माफी मागितली. मात्र, सलूनवाल्याने शेंडीच कापल्याने शिवांनद आक्रमक झाले होते.
शिवांनद यांनी पोलीस ठाण्यात सलूनचालक भावेश यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करत ठार मारण्याची धमकी देणे अशी तक्रार दिली आहे. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत सलूनचालक भावेशविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.





























































