
हँडसम दिसण्यासाठी पुरुषदेखील ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करू शकतात, तर जिथे आवश्यक आहे त्या वेळेस मेकअपही करू शकतात. अलीकडच्या काळात मेकअप किंवा ब्युटी इंडस्ट्री ही फक्त महिला वर्गासाठी नसून ती पुरुषांसाठीही मोठय़ा प्रमाणात काम करत आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार पुरुषही मोठय़ा प्रमाणात ब्युटी प्रॉडक्ट्स व मेकअपचा वापर करतात.
पुरुष असो किंवा महिला, आपली त्वचा सुंदर, सतेज, निकोप असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. आपल्या चेहऱयावर डाग नसावेत, ती तजेलदार दिसावी, चमकदार दिसावी, आपण तरुण दिसावं याकरिता अनेक जण वेगवेगळे उपाय, प्रयोग करत असतात. आपण आपल्या त्वचेची जेवढी जास्त काळजी घेऊ, तेवढं आपलं व्यक्तिमत्त्व आकर्षक व रुबाबदार दिसतं. त्यासाठी पुरुषांनी योग्य आहार घेणं, योग्य फलाहार घेणं, शरीरासाठी लागणारे पाणी योग्य प्रमाणात पिणं तसेच त्वचेसाठी काही ब्युटी रूटिन सांभाळणं गरजेचं आहे.
पुरुषांमध्येदेखील सुरकुत्या येणे, डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स, ब्राऊन स्पोर्टस् किंवा पिग्मेंटेशन अशी लक्षणे दिसून येतात. त्याकरिता साधारण विशीनंतर त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे असून त्वचा तरुण निरोगी राहण्याकरिता त्वचेच्या देखभालीकरिता नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यास त्वचेचं आयुष्यमान टिकून राहील. तसेच आपल्या दैनंदिन सवयी व आपला आहार योग्य रीतीने सांभाळला तर आपली त्वचा निरोगी व निकोप दिसेल.
पुरुषांनी स्वतःची वैयक्तिक काळजी घेताना स्वतःचं ग्रुमिंग करून घेणंही खूप महत्त्वाचं आहे. वातावरणातील धुळीकणांमुळे अनेक वेळा त्वचा काळवंडते, खराब होते. चेहरा जर दोन-तीन वेळा धुतला तर त्वचा स्वच्छ राहील. तसेच तुम्ही दाढीसाठी जे ब्लेड वापरता ते दाढी केल्यानंतर निर्जंतुक करून घ्या. त्यासाठी तुरटीचा वापर करू शकता. तसेच दाढी केल्यानंतर तुमच्या त्वचेवर डिसइन्फेक्टेड जेल किंवा तुरटी फिरवा. तुम्ही केसांसाठी जो ब्रश किंवा कंगवा वापरणार असाल, तोही अधूनमधून स्वच्छ करा. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे किंवा इन्फेक्शन होणार नाही.
पुरुषांनीही क्लिन्झिंग, टोनिंग,मॉइश्चरायझिंग या गोष्टींचा वापर केल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर मॉइश्चरायझर व सनस्क्रीनचा वापरा.
साध्या मेकअप टिप्स
तुम्हाला जर एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी किंवा खास कार्यक्रमासाठी बाहेर जायचं असेल तर तेव्हा तुम्ही मॉईश्चरायझर तसेच सनस्क्रीनचा वापर करा. सन स्क्रीन वापर करून त्यावर जर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर कन्सिलरचा वापर करा आणि मग त्यावर एखादी तुमच्या त्वचेच्या रंगाप्रमाणे कॉम्पॅक्ट पावडर घेऊन ती तुम्ही तुमच्या चेहऱयावर लावू शकता. तुम्ही जर असा विचार करत असाल की, कन्सिलर हे फक्त मुलींसाठीच असतं तर हा तुमचा चुकीचा गैरसमज आहे. चेहऱयावर कन्सिलर लावल्यामुळे त्यावर जर तुम्ही एखादी बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम लावली तर तुमचा चेहरा इव्हन दिसतो. तसेच कन्सिलर लावल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही फाऊंडेशनचाही वापर करू शकता. त्यावर त्याच रंगाची मिळती जुळती कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर लावा.
डार्क आयब्रो असतील तर त्या मात्र तुम्ही मलमलच्या सहाय्याने किंवा टिशूच्या साह्याने व्यवस्थित पुसून घेऊन त्यावर हलकासा ब्रश करून तुम्ही त्या सेट करू शकता. जर एखाद्याच्या आयब्रो खूपच लाईट असतील तर तुम्ही आयब्रो पेन्सिलचा वापर करून त्या रंगवू शकता आणि जर त्यानंतर तुमच्या ओठांवर चांगल्या दर्जाचं लिप बाम लावून ओठांना हायड्रेट करू शकता. यासाठी अनेक वेळा नैसर्गिक लिप बाम ही तुम्ही वापरू शकता.
तुम्ही जर दाढी किंवा मिशी ठेवत असाल तर तीही तुम्ही कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर लावल्यानंतर हलकीशी पुसून घेऊन ती व्यवस्थित विंचरून घ्या. ज्यामुळे तुमच्या दाढीचा किंवा मिशीचा रंग लाईट दिसणार नाही. अशा प्रकारे अतिशय सोप्या मेकअप टिप्स तुम्ही वापरून स्वतःचा मेकअप केला तर तुमचं व्यक्तिमत्त्व आकर्षकही दिसेल.
शिवानी दिनेश गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)





























































