मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय सुरु होण्यास तारीख पे तारीख, तीन कुलगुरू, पाच कुलसचिवांच्या कार्यकाळात दुरुस्ती सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयांमधील पुस्तकांचा अमूल्य ठेवा विद्यार्थ्यांच्या हाती कधी मिळेल, असा प्रश्न उभा राहिला आहे. 2016 पासून विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची दुरुस्ती आणि नवीन ग्रंथालय इमारतीची बांधणी सुरू आहे, मात्र पाच वर्षे पूर्ण झाली तरी दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. एप्रिलमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीवेळी विद्यापीठाकडून ग्रंथालय दुरुस्ती आणि नवीन ग्रंथालय इमारत 31 मेपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नसून ग्रंथालय सुरू होण्यास तारीख पे तारीख मिळत आहे.

मागील चार वर्षांपासून युवासेना सिनेट सदस्यांच्या वतीने जवाहरलाल नेहरू ग्रंथालय आणि नवीन इमारत सुरू करण्यासाठी सिनेटमध्ये आणि वारंवार पत्रव्यवहार करूनही कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळत नाही, असा आरोप युवासेना सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांनी केला आहे. दुरुस्ती सुरू असलेल्या भागात धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. पुस्तकांचीदेखील दुरवस्था झाली आहे. दुरूस्ती कामाभोवतीच पसरलेल्या पुस्तकांची काळजी घेण्यास कोणतीही यंत्रणा सज्ज नाही. पुस्तकांची मागणी, निगा, देखरेख, संवर्धन यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरजही ऍड. थोरात यांनी व्यक्त केली. ग्रंथालय दुरुस्तीच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली.

– जवाहरलाल नेहरू ग्रंथालय दुरुस्तीचे काम इतक्या संथगतीने सुरू आहे की, या कालावधीत विद्यापीठात तीन कुलगुरू आणि पाच कुलसचिव झाले तर आताच्या कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत आला तरी ग्रंथालयाची दुरुस्ती सुरूच आहे.

– 2016 पासून सुरू केलेली ग्रंथालयाची दुरुस्ती 2022 मध्येदेखील सुरू आहे. दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने डेंब्रीज इमारतीच्या आजूबाजूने टाकले आहे. डेंब्रीजची विल्हेवाट लावणे ही कंत्राटदाराची जबाबदारी, मात्र इमारतींच्या खिडक्यांपर्यंत डेंब्रीजचा थर जमविला आहे.