
सामना प्रतिनिधी । चारठाणा
सेलू तालुक्यातील बारा गावांच्या दुष्काळी अनुदान वाटपाच्या याद्या अनुदानाच्या निधीसह बँकेत येवून अडीच महिन्याचा कालावधी लोटले आहे. असे असताना बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचे वाटप करण्यात आले नाही. बँकेचा अनागोंदी कारभार या घटनेमुळे अक्षरश:चव्हाट्यावर आला आहे. शेतकरीवर्गात बँकेच्या कारभाराबद्दल तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेला एकूण २८ गावे जोडलेली आहेत. सध्या सेलू तालुक्यातील १२ गावातील दुष्काळी अनुदानाच्या याद्या संबधित शाखेला १० फेब्रुवारी २०१९ रोजी महसूल विभागाकडून प्राप्त झाल्या होत्या. यासाठी एकूण १० कोटी रुपायाचा धनादेश संबधित बँकेला दिला होता. परंतु तब्बल अडीच महिन्यानंतर २३ एप्रिलपासून बँकेने अनुदानाचे वाटप सुरु केले आहे. विशेष म्हणजे सदर बँकेत नेहमीच पैशांचा तुटवडा असतो दररोज पाच पन्नास लोकांच्या हातात अनुदानाची रक्कम पडते. उर्वरीत लोकांना दिवसभर बँकेत थांबुन सायंकाळी हात हलवित घराकडे परतावे लागते अशी परिस्थीती आहे. दररोज शेतकरी ५ वाजेपर्यंत बँकेजवळ थांबतात. परंतु कॅश आली नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना घरी परत जाण्यासाठी सांगण्यात येते. विशेष म्हणजे सायंकाळी उशीरा कॅश आणून शेतकऱ्यांना वाटली जात नाही. दुसऱ्या दिवशी इतर ग्राहकांना व मर्जीतल्या लोकांना रक्कम दिली जाते. बँकेचा मनमाणी कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याची चर्चा नागरिक चवीने चर्चीत आहेत.
शेतकऱ्यांना व इतर ग्राहकांना खाते पुस्तकावर जमा असलेल्या रक्कमेची नोंद दिली जात नाही. शिवाय ग्राहकांनी नोंदी मागू नयेत अशा स्पष्ट सुचना देखील बँकेच्या सुचना फलकावर लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरील जमा असलेल्या रक्कमा देखील कमी होत झाल्याच्या तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सध्या बाराखडी नुसार गावाचे वाटप सुरु करण्यात आले असले तरी अद्यापपर्यंत केवळ अरसड या एकाच गावातील एकूण १६० शेतकऱ्यांचे वाटप पूर्ण झाले आहेत. बोथ व बोरकीनी या २ गावाचे वाटपाचे काम सध्या सुरु आहे. दरम्यान वाटपाचे काम कासव गतीने असेच सुरु राहील्यास वाटप पूर्ण होण्यास किमान पाच-सहा महिने तरी लागतील, अशी शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या नावावर खरे तर बँकेने परस्पर अनुदान रकमा जमा करुन संबधित ग्राहाकास मोबाईलवर मॅसेज पाठविणे आवश्यक असतांना तसे न करता, शेतकऱ्यांकडून बँकेत जमा चालान भरुन घेतले जात असुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.
खरे तर अडीच महिन्यापूर्वी सेलू तालुक्यातील गावांच्या याद्या व सदर रकमेचा धनादेश बँकेला प्राप्त झाला असतांना एवढे दिवस सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा का केल्या नाहीत हा प्रश्न निरुत्तर आहे. अनुदान वाटप सुरु करण्यापूर्वीच काही मोजक्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप संबधित बँकेतून झाले आहे. इतर शेतकऱ्यांना मात्र अनेक दिवस वाऱ्यावर ठेवण्याचे काम पध्दतशीर पणे स्थानिक बँक प्रशासनाकडून झालेले आहे. सदर दुष्काळी अनुदानातुन प्रत्येक शेतकऱ्यांचे ५९ रुपये कमिशन देखील सदर बँक शाखेकडून कपात केले जात आहे. एकंदरीत शासनाने बँकेला अनुदान पाठविल्या नंतर देखील शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा संबधित बँकेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याने अधिच आर्थीक अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला असून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालुन सदरील बँकेच्या कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
बॅकेचे इंटरनेट सर्व्हर चालत आहे धिम्या गतीने
ग्राहकांच्या अनेक तक्रारी व बॅक प्रशासन यांच्या धिम्या गतीने चालणाऱ्या कामाबाबत विचारणा केली असता, बँकेचे सर्व्हर धिम्या गतीने चालत असल्याने सदर परिस्थिती आहे. याचा नाहक त्रास खातेदारांना सहन करावा लागत आहे.
इंटरनेट सुविधा बसवणे आवश्यक
बॅक कर्मचाऱ्यांना काम करत आसतांना बॅक इंटरनेट सर्व्हरचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. परिणामी ग्राहकांना सेवा देण्यासाठी वेळ लागत आहे परिणामी अनेक ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. करीता बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर बाबींकडे गांभिर्याने लक्ष घालून चांगल्या दर्जाचे इंटरनेट सुविधा पुरविणे गरजेचे आहे. या ठिकाणीच्या बँक मधील अधिकारी व कर्मचारी आप आपल्या ओळखीचा नागरिक व चेहरा पाहून काम करत आहेत. तसेच या ठिकाणी दलालाचा खूप मोठा सुळसुळाट असल्याचे दिसून येते.






























































