
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या 26/11 हल्ल्याला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या हल्ल्याचा मास्टरमाईंड अजूनही मोकाट असून ओळख लपवण्यासाठी त्याने प्लास्टीक सर्जरी केली आहे. अशी धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
एका इंग्रजी वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत या अधिकाऱ्याने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीर गेल्या दोन वर्षांपासून अंडरग्राऊंड असून त्याने प्लास्टीक सर्जरी करून चेहरा बदलला आहे असे सांगितले आहे.
साजिद मीर हा 26/11हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. तो लश्कर-ए-तोयबाच्या कराची येथील प्रोजेक्टचा प्रमुख होता. डेन्मार्क मधील ‘jyllands- posten’ या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्याची योजना त्याने आखली होती. या वृत्तपत्रात पैगंबर मोहम्मद यांचे कार्टुन छापण्यात आले होते. या अपमानाचा बदला म्हणून वृत्तपत्राचे कार्यालयच उडवण्याचा मीरचा डाव होता. पण मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यामागे लश्कर-ए-तोयबा व पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याचे समोर आले. यामुळे jyllands- posten या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्याची योजना मीरने थांबवली.
दरम्यान, साजिद मीरबरोबरच 26/11 हल्ल्यात अब्दुर रहमान सैय्यद या पाकिस्तानी लष्करातील माजी अधिकाऱ्याचाही समावेश होता. 26/11 हल्ल्यासाठी मीर नेच आर्थिक रसद पुरवली होती. त्याच्या मार्गदर्शनाखालीच दहशतवादी अजमल कसाब व इतर दहशतवादी हल्ले करत होते, असे हिंदुस्थानी तपास यंत्रणांनी म्हटले आहे.



























































