सिडनी विमानतळावर उचलेगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सिडनी विमानतळावरील दुकानातील उचलेगिरी एअर इंडियाच्या विभागीय संचालकाला चांगलीच महागात पडली. रोहित भसिन याने दुकानातील सामान उचलून स्वत:च्या खिशात घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकाराची एअर इंडियाने कसून चौकशी सुरू केली आहे.

एअर इंडियाचे ‘एआय-301’ हे विमान सिडनीतून दिल्लीला येण्यासाठी ‘टेक ऑफ’ घेणार होते. तत्पूर्वी भसिन याला फोन कॉल आला व त्याने लगेच विमानतळावरील दुकानात जाऊन पैसे न देताच तेथील सामान उचलून खिशात घातले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर ऑस्ट्रेलियातील एअर इंडियाच्या विभागीय व्यवस्थापकाने भसिन याच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्याच्या आधारे भसिनला चौकशी पूर्ण होईपर्यंत सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

आजोबा बनल्याच्या आनंदात विसरलो!
विमान ‘टेक ऑफ’ घेण्याच्या काही मिनिटे आधी नातेवाईकांचा फोन कॉल आला व आपण आजोबा बनल्याची बातमी कळली. मी त्या आनंदात दुकान गाठले व सुनेसाठी काही गिफ्ट घेतल्या. विमानाला उशीर नको म्हणून मी लगेच दुकान सोडले. त्या आनंदात पैसे देणे विसरलो, अशी सारवासारव भसिनने केली आहे.