दिल्ली ‘विषारी’ शहर, आरोग्याची आणीबाणी; शाळांना 5 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वायुप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे राजधानी दिल्लीची हवा विषारी बनली आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी हे प्रदूषण अत्यंत घातक असल्यामुळे हेल्थ इमर्जन्सी (आरोग्य आणीबाणी) लागू करण्यात आली आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे.

देशातील प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा समावेश होतो. दिवाळीच्या काळात दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात फटाक्यांमुळे वायुप्रदूषणात आणखी वाढ होते. दाट धुके आणि प्रदूषण यामुळे दिल्लीची हवा आरोग्यासाठी हानिकारक बनली आहे. ही परिस्थिती गंभीर असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाचे (ईपीसीए) अध्यक्ष भुरेलाल यांनी म्हटले आहे. दिल्ली आणि जवळील हरयाणा, उत्तर प्रदेशच्या सचिवांनाही पत्र पाठविण्यात आले असून प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे सांगितले आहे.

– नागरिकांचे आयुष्य सात वर्षांनी घटले
वायुप्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस घातक बनत आहे. दिल्लीसह देशातील अनेक शहरांत हवेत विषारी घटक वाढले आहेत. देशातील नागरिकांचे आयुष्य या प्रदूषणामुळे सात वर्षांनी घटले आहे. श्वसनाचे, फुप्फुसाचे रुग्ण वाढत आहेत असे ‘ईपीसीए’ने म्हटले आहे.

– फटाके फोडण्यावर आणि बांधकामास बंदी
दिल्लीसह फरिदाबाद, गुरग्राम, नोएडा, ग्रेटर नोयडा येथील बांधकामांवर 5 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण हिवाळ्यात फटाके फोडण्यास बंदी घातली आहे.