दिल्ली – महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पत्रकारावरील जीवघेण्या हल्ल्याने खळबळ

567

राजधानी दिल्लीमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्लीत भर दिवसा एका महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकार जोयमाला बागची यांच्यावर हा हल्ला झाला आहे. चालत्या रिक्षातून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या प्रकृती स्थिर आहे.

रविवारी 22 सप्टेंबर रोजी दिल्लीतील चितरंजन पार्क भागात शॉपिंवरून परत येत असताना दुचाकी चालकांनी महिला पत्रकारावर हल्ला चढवला. दुचाकीवरून धक्का देऊन रिक्षात बसलेल्या जोयमाला यांना रस्त्यावर ढकलून देण्यात आले. रस्त्यावर जोरात आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या. यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून अज्ञात लोकांविरुद्ध कलम 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलीस उपायुक्तांनी या घटनेची दखल घेतली असून पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. सध्या पोलिसांना या भागातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्याआधारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या