दिल्लीकर गारठले, 22 वर्षामध्ये पहिल्यांदाच पडली एवढी कडाक्याची थंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cold

राजधानी दिल्लीमध्ये थंडीचा पारा लुडकला आहे. बुधवारी सकाळी दिल्लीमध्ये 5.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या 22 वर्षामध्ये डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच राजधानीमध्ये सलग 10 दिवस एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली. याआधी 1997 मध्ये सलग 17 दिवस दिल्लीकरांना कुडकुडत काढावे लागले होते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. 1997 नंतर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये सर्वाधिक थंड दिवस पाहायला मिळत आहेत. 1997 ला सलग 17 दिवस दिल्लीकरांनी कडाक्याची थंडी अनुभवली होती. तर 2014 मध्ये सलग आठ दिवस दिल्ली गारठली होती. यानंतर आता 22 वर्षांनी सलग 10 दिवस दिल्लीमध्ये निच्चांकी तापमानाची नोद झाली असून येत्या काही दिवस थंडीचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.

दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद आणि गुरुग्राम येथे देखील थंडीचा कहर सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसात ही थंडी अजून वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळाली. 28 डिसेंबर ते 30 डिसेंबरला दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरांचे तापमान 4 अंशांवर येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. थंडीसोबत दाट धुकेही पडणार असल्याने याचा थेट प्रभाव रेल्वेवाहतूक आणि हवाई वाहतुकीवर पडू शकतो.