दिल्ली डायरी – नितीशबाबू नेमकं काय करणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

विधान परिषद निवडणुकीतील निकालांनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशबाबू यांच्या पायाखालचे ‘जाजम’ खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभेपाठोपाठ भाजपचे संख्याबळ बिहार विधान परिषदेतही संयुक्त जनता दलापेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे भाजप परिवारात मुख्यमंत्रीपदाची ‘हाय टाईड’ आली आहे. दुसरीकडे बिहारचे पाचवेळा मुख्यमंत्री बनल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात नितीश कुमारांसमोर ‘पक्षाचे पुढे काय करायचे?’ असा प्रश्न आहे. ते पक्षहिताला प्राधान्य देतात की मायावतींप्रमाणे ‘स्वहिता’ला प्राधान्य देतात, यावर बिहारचा पुढचा इतिहास अवलंबून असेल.

बिहारमध्ये भाजपला नितीशबाबूंना नाइलाजाने मुख्यमंत्री बनवावे लागले होते. आता नितीश कुमारांचा ‘मायावती’ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी नितीशबाबूंचे नाव चालवून बिहार ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे नितीश कुमार हेदेखील कसलेले मुरब्बी राजकारणी आहेत. ते स्वतःला सुशासनबाबू वगैरे म्हणवून घेत असले तरी पलटूराम राजकारणात त्यांचा हात धरणारा देशात तरी कोणी नाही. असा कोणताही पक्ष नाही की, ज्याच्याशी नितीशबाबूंनी सत्तेसाठी तडजोडी केलेल्या नाहीत. सुरुवातीला जयप्रकाश नारायण यांच्या विचारधारेची साथ सोडणाऱया नितीश कुमारांनी नंतर जॉर्ज फर्नांडिस व शरद यादव या ज्येष्ठांनाही वाऱयावर सोडले आणि आपले सोयिस्कर राजकारण पुढे दामटले. नितीशबाबूंना ना भाजपच्या सोवळ्याचा धसका आहे ना लालू यादवांचे पुरोगामी राजकारण अस्पृश्य आहे. सत्ता हेच ब्रीद डोक्यात ठेवून नितीशबाबूंनी पाचवेळा मुख्यमंत्रीपद काबीज केले ते अशाच सोयिस्कर राजकारणामुळे!

नितीश कुमारांना दिल्लीत मोठे पद दिले जाणार अशी उन्हाळी हवा सध्या राजधानीत पसरली आहे. त्या बदल्यात नितीशबाबू मुख्यमंत्रीपदाची खुर्ची भाजपला बहाल करतील अशी अटकळ आहे. मात्र, नितीश कुमारांसारख्या रंग बदलणाऱया राजकारण्याबाबत अशा अटकळी लावणे हा मोठा धोका आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली केल्याच तर भविष्यात नितीशबाबू तेजस्वी यादवांसोबत नवे सरकार स्थापन करून मोकळे झाले तरी आश्चर्य वाटायला नको. तुलनेने भ्रष्ट प्रतिमा नसणे ही नितीशबाबूंची आजवरची सर्वात जमेची बाजू आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी प्रयत्न करूनही ते अजून नितीशबाबूंना कोणत्याही प्रकरणात अडकवू शकलेले नाहीत. नितीश कुमारांचे राजकीय वर्चस्व हळूहळू कमी होत आहे हे राजकीय वास्तव आहे. त्यामुळेच भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी उचल खाल्ली आहे. उपेंद्र कुशवाह यांनी 2025 पर्यंत नितीश कुमारच मुख्यमंत्री राहतील हे ठासून वगैरे सांगितलेले असले तरी प्रत्यक्षात कुशवाह महाशय कोणत्याही राजकीय पक्षांत पाच वर्षांपेक्षा अधिक काळ टिकत नाहीत असा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी नितीश कुमारांबाबत केलेली भविष्यवाणी एक गंमतच म्हणावी लागेल. बिहारचे पाचवेळा मुख्यमंत्री बनल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात नितीश कुमारांसमोर ‘पक्षाचे पुढे काय करायचे?’ असा प्रश्न आहे. ते पक्षहिताला प्राधान्य देतात की मायावतींप्रमाणे ‘स्वहिता’ला प्राधान्य देतात, यावर बिहारचा पुढचा इतिहास अवलंबून असेल. नितीशबाबू हे रिमोट कंट्रोलवर चालणारे राष्ट्रपती असणार नाहीत याची जाणीव असल्याने दिल्लीकर त्यांचा फार फार तर उपराष्ट्रपतीपदासाठी विचार करतील. मात्र, नितीशबाबू ते मान्य करतील काय? हा खरा प्रश्न आहे. नितीश कुमारांनी भाजपची ऑफर स्वीकारली तर मायावतींनंतर भाजपसाठी राजकीय हौतात्म्य स्वीकारणारे ते दुसरे नेते ठरतील.

12 जनपथ

देशाच्या राजकारणात अनन्यसाधारण असे महत्त्व सोनिया गांधींच्या ‘10 जनपथ’ला आहे. ‘10 जनपथ’च्या मागच्या बाजूला असलेल्या ‘12 जनपथ’लादेखील एकेकाळी मोठे महत्त्व असायचे. रामविलास पासवान यांचे हे शासकीय निवासस्थान. पक्ष कोणताही असो, सरकार कोणतेही असो, रामविलास केंद्रात मंत्री हमखास बनायचे. बाबू जगजीवनराम यांच्यानंतर दलित समाजातले बिहारचे सर्वात मोठे नेते. दलितच नव्हे, तर प्रत्येक बिहारी माणसाबद्दल आत्मीयता असल्याने पासवान हे पक्षविरहित नेते लोकनेते होते. साहजिकच त्यांच्या ‘12 जनपथ’वर असंख्य लोकांची वर्दळ असायची. पासवान यांच्या राजकीय कारकीर्दीचा साक्षीदार असलेला बंगला केंद्रीय सरकारने पासवानांचे सामान ट्रकमध्ये भरून ताब्यात घेतला. पासवान गेल्यानंतर हा बंगला नियमानुसार तसा सोडावा लागणार होता. पासवानांचे खासदार चिरंजीव चिराग यांना खासदार म्हणून वेगळे निवासस्थान मिळाले. पासवानांच्या निधनानंतर भाजपने त्यांचा पक्षच फोडला. भावाची आणि पुतण्याची फारकत केली. त्यात पासवानांच्या पक्षावरचा मुलाचा ताबाही गेला आणि आता बंगलाही. ‘12 जनपथ’ हा पासवानांच्या राजकीय प्रवासाचे ‘प्रतीक’ होता. या बंगल्याचे ‘स्मारक’ म्हणून जनत करावे या मागणीसाठी चिराग लढत राहिले. मात्र, राजकारणात मित्रपक्षांचा सोयिस्करपणे वापर करून फेकण्याचे सत्ताधीशांचे धोरण असल्याने चिराग यांच्या पदरी निराशाच पडली. दिल्लीत अनेक नेत्यांची स्मृतिस्थळे आहेत. पासवान त्या पंक्तीत बसतात की नाही, यावर वाद होऊ शकतो. मात्र, रामविलास पासवान देशातील एक मोठे नेते होते हे कसे विसरता येईल?

वेदनादायी चित्र…

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मीडियाची मुस्कटदाबी होत असल्याचे राजरोस बोलले जाते. सरकारी बाजूने बोलणाऱया मीडियाला ‘गोदी मीडिया’ असे नामाभिधानही याचमुळे प्राप्त झाले आहे. सरकारच्या विरोधात लिहिण्याची धमक जे दाखवतात, त्यांच्यावर सरकारची वक्रदृष्टी पडतेच पडते. आता ही वक्रदृष्टी केंद्रीय सरकारची नाही, तर मध्य प्रदेशातील शिवराजसिंग सरकारची आहे. सीधी जिह्यातील आमदार केदारनाथ शुक्ला व त्यांचे प्रतापी चिरंजीव गुरुदत्त शुक्ला यांच्याविरोधात स्थानिक पत्रकार कनिष्क तिवारी यांनी एक बातमी चालवली. त्याचा आमदारांना इतका राग आला की, पोलिसांनी तिवारी यांच्यासह तिथले थिएटर कलाकार नीरज कुंदर यांना पोलीस ठाण्यात नेऊन, सात जणांचे कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत उभे केले. ‘‘एमएलए केदारनाथ शुक्ला के खिलाफ खबरे चलाते हो…एमएलए क्या तुम्हारे घर के बर्तन बांझने का काम करेगा क्या? इसके आगे शुक्ला के खिलाफ कुछ किया तो शहर में नंगा घुमाऊंगा’’ अशा शब्दांत पोलिसांनी दमदाटी केली. या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. देशातील मीडियाने आणि विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यानंतर या प्रकरणाची दखल नाइलाजाने का होईना, शिवराजसिंग यांना घ्यावी लागली. पोलिसांना निलंबित वगैरे केले गेले. मात्र, ‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती है…मामाजी’. सीधीच्या पोलीस स्टेशनात दिसलेले चित्र वेदनादायी आहे, शिवाय शिवराजसिंग यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारेही

n [email protected]आहे.