
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळविल्यानंतर योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात योगींना ज्या पद्धतीने दोन-तीन दिवस दिल्लीत फिरावे लागले त्यावरून योगींची पुढची वाटचाल खडतर दिसते. आता योगी दुसऱयांदा निवडून आल्यानंतर व केशवप्रसाद मौर्या यांचा ज्या पद्धतीने पराभव घडवून आणला गेल्यानंतर भाजपमध्ये सत्तासंघर्षाचा ‘दुसरा अंक’ सुरू होण्याची शक्यता आहे.
‘योगी उपयोगी है,’ अशी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल सुरुवातीला मागितला होता. मात्र योगींबाबत जनमत अनुकूल नसल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील सत्ता वाचविण्यासाठी खुद्द पंतप्रधान मैदानात उतरले. हळूहळू पोस्टरवरून योगी गायब झाले. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. त्या यशाचे श्रेय निःसंशय मोदींचेच. उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळेल याची खात्री भाजपच्या मंडळींनाच नव्हती. बहुमताला आकडा कमी पडेल आणि ‘आपल्या मर्जी’तील नेत्याची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावता येईल अशी रणनीतीही दिल्लीतून आखण्यात आली होती. मात्र स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता दिल्लीकरांचीही कोंडी झाली आहे. ‘डबल इंजिन’ वगैरे ठीक आहे. आता सिंगल इंजिनमधील कोळसा किती काळ चालतो ते पाहायचे.
योगी आदित्यनाथ यांच्या आधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील एक घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकेदिवशी मूळचे उत्तर प्रदेशचे भूमिहार असलेले आपले सचिव ए. के. शर्मांना बोलावले आणि नोकरीचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला दिला. बॉसचा हुकूम मानून शर्मा उत्तर प्रदेशमध्ये आले, मात्र योगींनी त्यांना बिलकूल जुमानले नाही. शर्मांना उपमुख्यमंत्री करा असे मोदींनी सांगूनही योगींनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. शेवटी दोन पावले मागे घेत वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी आणि विधान परिषदेचे सदस्यत्व या जबाबदाऱया देऊन मोदी व योगींमधील सुप्त संघर्षांचा ‘पहिला अंक’ संपला. आता योगी दुसऱयांदा निवडून आल्यानंतर व केशवप्रसाद मौर्या यांचा ज्या पद्धतीने पराभव घडवून आणला गेल्यानंतर भाजपमध्ये सत्तासंघर्षाचा ‘दुसरा अंक’ सुरू होण्याची शक्यता आहे. योगींचे राजकारण केवळ ठाकूरधार्जिणे आहे. हिंदुत्व हा केवळ मास्क आहे हे आता लपून राहिलेले नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चमकदार कामगिरी करायची असेल तर सर्वच जातीसमूहांत ‘फील गुड’ असणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने योगींच्या जातीयवादी राजकारणावर अंकुश लावण्यासाठी ए. के. शर्मा आणि बेबीरानी मौर्या यांना उपमुख्यमंत्रीपदी नेमले जाण्याची शक्यता आहे. आणखीही एखादा उपमुख्यमंत्री योगींच्या डोक्यावर बसवला जाऊ शकतो. योगींनी गृहखात्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप मोठय़ा प्रमाणावर होतो. हे खातेच योगींकडून काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील विजयानंतर योगींचे दिल्लीत तसे थंडच स्वागत झाले. यावरून ‘ऑल इज नॉट वेल’ असाच संकेत गेला आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदाच्या निवडीपासून ते मंत्रिमंडळ रचनेपर्यंतची जबाबदारी पंतप्रधानांनी आपले खासम्खास अमित शहा यांच्याकडे सोपवली आहे. यातच सगळे आले. गेल्या आठ वर्षांत मोदी-शहा यांना थेट आव्हान देण्याची राजकीय हिंमत योगींनी दाखवली होती. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. योगी उपयोगी ठरले की नाहीत हा वेगळा भाग, मात्र योगी ‘निरुपयोगी’ आहेत हे सिद्ध करण्यासाठी आता डाव टाकला जाण्याची शक्यता आहे.
बलदेव कौर यांची ‘साफसफाई’
पंजाबच्या निवडणुकीने यंदा इतिहास रचला. पंजाबला नशामुक्त करण्यासाठी जनतेनेच उठाव करत आम आदमी पार्टीला प्रचंड बुहमताचा कौल दिला. ‘आप’ची लाट इतकी जबरदस्त होती की, ‘नशायुक्त’ पंजाबसाठी हातभार लावून कायम सग्यासोयऱयांचे सोयिस्कर राजकारण करणाऱया बादल, अमरिंदर, सिद्धू अशा नात्यागोत्याच्या राजकारणाची जनतेने गठडी वळून झेलममध्ये विसर्जित केली. प्रकाशसिंग बादलांसारख्या टोलेजंग नेत्यालाही जनतेने घरी बसवले. चरणजितसिंग चन्नी यांच्या रूपाने दलित मुख्यमंत्री नेमण्याची खेळी काँग्रेसवरच उलटली. याच चरणजितसिंग यांचा भदौरमधून पराभव करणारे लाभसिंग सध्या चर्चेत आहेत. लाभसिंग हा एक सामान्य माणसू मोबाईल रिपेअरिंगचे काम करणारा. त्यांची आई बलदेव कौर या सरकारी शाळेत कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून काम करतात. बलदेव यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि ते आमदार झाले. आता कोणा आमदाराची आई सफाई कामगार म्हणून काम करेल काय, आपल्याकडे कल्पनाही करवत नाही. मात्र बलदेव यांनी निकालाचा गुलाल उतरला नाही तोच दुसऱया दिवशी झाडू घेऊन शाळेची साफसफाई करायला सुरुवात केली. ‘बेटा विधायक बना अच्छी बात है, लेकिन मै मेरा काम करती रहूंगी,’ असे बाणेदार उद्गार बलदेव कौर यांनी काढले आहेत. राजकारण हे फक्त अनिती आणि पैशाच्या इमल्यावर उभारलेले आहे, या भ्रमात असणाऱयांचा भ्रम दूर करणारे हे उदाहरण आहे. राजकारणात अजूनही अनेक ठिकाणी अशी नीतिमत्ता व प्रामाणिकपणा टिकून आहे. बलदेव कौर यांच्या हातातला ‘झाडू’ हे ‘स्वच्छतेचे प्रतीक’ आहे. आम आदमी पार्टीचे ते निवडणूक चिन्हही! याच ‘झाडू’ने ‘नशायुक्त पंजाब’मधील नशेचा ‘कचरा’ कायमचा साफ व्हावा हीच अपेक्षा!

























































