लेख : दिल्ली डायरी : संसद अधिवेशन ‘फेअरवेल सेशन’ ठरणार का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

जस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाचे टायमिंग साधत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मोदी सरकारचे हे शेवटचे औपचारिक अधिवेशन. त्यातील व्होट ऑन अकाऊंट ही निव्वळ अर्थप्रकियेची औपचारिकता असेल. आता या सरकारचे हे ‘फेअरवेल सेशन’ ठरेल अशा घोषणा विरोधक ‘एक्झिट पोल’चे ‘टॉनिक’ पिऊन देत आहेत. अर्थात  या निवडणुकांत जनतेचा कौल कदाचित मिळाला तरी विरोधकांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. पाच राज्यांत भाजपला धक्का बसला तर नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा पंतप्रधान होण्याच्या स्वप्नपूर्तीला अडथळा येणार नसला तरी त्यांचा प्रवास बिकट होऊ शकतो हे नक्की.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये एकंदरीतच प्रचाराची पातळी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारापेक्षाही खालच्या थराला गेली. पंतप्रधानांनी सोनिया गांधींवर भाष्य करून काँग्रेसला सहानुभूतीच्या लाटेची आयतीच संधी दिली. ‘राजस्थानात रामाचे आजोळ आहे म्हणून आम्हाला निवडून द्या’ या भाषेमुळे मोदींवर विनोद व्हायला लागले. उरलीसुरली कसर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाला दलित संबोधून भरून काढली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही त्याबाबत मागे राहिले नाहीत. त्यांनी आपल्याच जाट नेत्याचे नामकरण ‘कुंभकर्ण’ करून आपण अजूनही झोपेतून जागे झालेलो नाही हेच सूचित केले. या वाचाळ प्रचारतंत्राचे पडसाद संसदेच्या अधिवेशनात उमटणारच आहेत. त्यामुळे या अधिवेशनातही जनमताचे किती प्रश्न धसाला लागतील याची  शंकाच आहे.

तिहेरी तलाक, महिला आरक्षणाच्या प्रश्नासह महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांतील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची होरपळ हे खरे तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील अजेंडय़ाचे प्रश्न आहेत, मात्र कुरघोडीच्या राजकारणामुळे या मुद्दय़ांना दिल्लीच्या थंडीत कुडकुडत राहावे लागण्याचीच शक्यता जास्त आहे. ‘नॉन इश्यू’वर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होईल आणि अधिवेशनाची इतिश्री नेहमीप्रमाणे होईल असाच रागरंग आहे.

raghuwar-dasरघुबर दासांचे मोबाईल नेटवर्क

‘विनोदी कारभारा’च्या बाबतीत मनोहरलाल खट्टर उजवे, योगी की बिप्लव देव, हा प्रश्न ‘कौन बनेगा करोडपती’सारखा रोकडा असला तरी हिमाचल आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही त्यात मागे नाहीत. झारखंड हे तसे उपेक्षित राज्य असल्यामुळे तेथील मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या कारनाम्यांकडे कोणाचे फारसे लक्ष जात नाही. मात्र मोबाईलला नेटवर्क न आल्याचा भलताच राग मध्यंतरी या रघुबर दासांना आला आणि त्यातून त्यांनी जे काही केले त्यामुळे त्यांची कीर्ती कर्णोपकर्णी पसरली. देशभरात सर्वदूर मोबाईल नेटवर्क पसरले असल्याचा दावा दूरसंचार खाते करत असते. मात्र राजस्थानात मंत्रिमंडळातील भाजपचेच एक सहकारी अर्जुराम मेघवाल यांना चक्क झाडावर चढून मोबाईल रेंज पकडावी लागली होती. मेघवाल यांनी झाडाच्या फांद्यावर बसून केलेले हॅलो हॅलो त्यावेळी चांगलेच गाजले होते. आता जनचौपालच्या निमित्ताने झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दुमका येथील राजभवनात मुक्कामाला होते. त्यांच्या मोबाईलला रेंज येत नव्हती. वास्तविक मुख्यमंत्री म्हटल्यावर त्यांच्याकडे संपर्काचे अनेक पर्याय उपलब्ध होते, मात्र ‘सीएम हूं और फोन नही लग रहा है, ये क्या बात हुई’ असा त्यांचा इगो दुखावला. मग त्यांच्या आदेशानुसार जिह्याचा दूरसंचार  अधिकाऱ्याला पोलिसांनी झोपेतून उठवून मध्यरात्री उचलले आणि तीन तास पोलीस ठाण्यात बसवले. पहाटे मुख्यमंत्री महोदयांचा राग निवळल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. रघुबर यांच्या या कृतीविरोधात टेलिफोन कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला तर विरोधकांनी ‘फॅसिस्ट सीएम’ म्हणून त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री रघुबर यांनी राग अनावर करण्यासाठी पंतप्रधानांकडूनच योगाचे धडे घ्यावेत, असा मिश्कील सल्ला यानिमित्ताने दिला जात आहे.

savitribai-fule-good-imageबंडखोरी

2014 मध्ये देशभरात मोदी लाट होती. उत्तर प्रदेशमध्ये तर अशा लाटेत अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषदांना जे तीनताड उताणे पडले असते असे उमेदवार थेट लोकसभेत ‘माननीय सासंद’ बनून सन्मानाने बसले. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या सावित्रीबाई फुले या त्यापैकीच एक! सावित्रीबाई भगवी वस्त्रे वगैरे परिधान करीत असल्याने त्यादेखील निरंजन ज्योती आणि उमा भारतींप्रमाणे ‘साध्वी’ तर नाहीत ना, अशी शंका सुरुवातीला यायची, मात्र त्यांनी ज्यापद्धतीने हिंदुत्वाविरोधात बॅटिंग केली त्यामुळे या सावित्रीबाई ‘बंडखोर’ असल्याची प्रचीती आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या कारभाराबद्दल प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळात योगींनी आपल्याला आपण दलित असल्याने भेटायला नकार दिला असा आरोप करून या सावित्रीबाईंनी खळबळ उडवून दिली होती. बॅ. जीनांची तरफदारी त्यांनी केली. आता योगींनी हनुमानाची ‘जात’ काढल्यानंतर त्या योगी आणि भाजपवर खवळल्या आहेत. भाजप सरकार जातीयवादी असून देशातून आरक्षण हटविण्याचा त्यांचा कट असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिलेले असताना आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. भाजप जातीयवादी आहे याची ‘जाणीव’ व्हायला या सावित्रीबाईंना पावणेपाच वर्षे लागली. यावरूनच त्यांच्या बंडातील ‘प्रामाणिकपणा’ दिसून येतो.