
नीलेश कुलकर्णी <<[email protected]>>
एक खंबीर आणि आक्रमक नेत्या म्हणून तृणमूल काँगेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ओळख आहे. कम्युनिस्टांचे लाल बावटे जमिनीत गाडून त्या राजकीय पटलावर आपला दबदबा राखून आहेत. मोदी सरकारच्या डळमळीत कामगिरीमुळे देशात ‘फेडरल फ्रंट’ची चर्चा सुरू असताना त्यात आक्रमक ममतादीदींचे नाव पंतप्रधानपदासाठी आघाडीवर आहे. त्यामुळे एरवी काहीशा लहरी असणाऱया ममतादीदींनी आपल्या स्वभावाला मुरड घालून नीती आयोगाच्या बैठकीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
पश्चिम बंगालमधील मालदा येथील प्रसिद्ध आम्रपाली आंब्याची पेटी भेट देऊनच ममतांनी प्रत्येक मुख्यमंत्री तसेच इतरांशी आपले सौहार्द वाढविले. पंतप्रधान मोदींशी मतभेद असले तरी ‘‘मोदीजी, हमारो आम्रोपाली आम बहुत खूब है’’ अशी तारीफ करत मोदींनाही आंब्याची पेटी भेट दिली.
ममता यांच्या आक्रस्ताळय़ा स्वभावाबद्दल ऐकून असणारे इतर मुख्यमंत्रीही त्यांच्या या डिप्लोमसीमुळे गांगरले. सर्वांना प्रेमाने आंब्याची पेटी देणाऱया ममतादीदी मात्र यावेळी रुष्ट झाल्या त्या तेलंगणाचे मुख्यमंत्री व टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांच्यावर. अगदी कडवे विरोधक असलेले केरळचे मार्क्सवादी मुख्यमंत्री विजयन यांनाही आंब्याची पेटी भेट देणाऱया दीदींनी चंद्रशेखर रावांना का वाळीत टाकले याची चर्चा नंतर दिल्लीत रंगली.
फेडरल फ्रंटच्या वेळी ममतांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचे चंद्रशेखर रावांनी कबूल केले होते. मात्र मोदींच्या दबावामुळे रावांनी आपली चाल बदलल्याने ममता त्यांच्यावर रुष्ट झाल्याचे सांगितले जाते. नीती आयोगाच्या बैठकीनंतर भाजपच्या मुख्यमंत्र्यांना न भेटता पंतप्रधानांनी चंद्राबाबू, चंद्रशेखर राव व कुमारस्वामींना खास बोलावून ‘गुलूगुलू’ केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. या तिघांना मोदींनी ‘गळाला’ लावल्याचे बोलले जात आहे.
‘‘अंगूर खट्टे है’’ असे आपण नेहमीच ऐकतो. मात्र तेलंगणात जबरदस्त काम करत असलेल्या चंद्रशेखर रावांसाठी ‘‘आम्रपाली आम खट्टे है’’ असेच म्हणावे लागेल.


























































