निवडणूक अर्ज भरण्यास निघाले, पण केजरीवाल गर्दीत अडकले

दिल्ली निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल आज आपला निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी घराबाहेर पडले खरे, पण त्यांच्या रोड शोला दिल्लीकरांनी एवढी गर्दी केली की ती गर्दी पार करून केजरीवाल यांना निवडणूक कार्यालयात पोहचताच आले नाही. आता ते उद्या मंगळवारी आपला अर्ज दाखल करतील.

दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल निवडणूक लढवणार आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात दिल्लीत पुन्हा ‘आप’चीच सत्ता येणार असल्याचे भाकीत असल्याने भाजपच्या तंबूत चिंतेचे वातावरण आहे. तर ‘आप’च्या गोटात मात्र प्रचंड उत्साह आहे. या उत्साहाचा फटका आज केजरीवाल यांनाच बसला. जामनगर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी केजरीवाल घरातून निघाले. निघताना आईचा आशीर्वाद आणि वाल्मीकी मंदिरात दर्शनही घेतले.

केजरीवाल यांचा रोड शो एवढा तुफानी होता की जणू समस्त दिल्लीकर ‘झाडू’न यात सामील झाले असावेत. दुपारी 3 वाजता उपविभागीय कार्यालय बंद झाले, मात्र तोपर्यंत केजरीवाल तेथे पोहचलेच नव्हते. आता अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून ते उद्याच अर्ज दाखल करतील.

आपली प्रतिक्रिया द्या