
दिल्लीतील पालम परिसरात एकाच कुटुंबातील ९ जणांचा बळी घेणाऱ्या भीषण अग्निकांडाच्या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. गुरुवारी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आणि शोकसभा आयोजित करण्यात आली असताना, आम आदमी पार्टी (AAP) आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालम येथील त्या दुर्दैवी कुटुंबाच्या घरी दोन्ही पक्षांचे नेते भेट देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी पीडितांच्या सांत्वनाऐवजी राजकीय श्रेयवादावरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ही चकमक इतकी वाढली की त्याचे रूपांतर हिंसक झडपेत झाले. उपस्थित लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र वातावरणात बराच वेळ तणाव होता.
या राड्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. भाजपने आधीच्या आप सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे, तर आपने भाजप या दुःखाच्या प्रसंगाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या नेत्यांच्या या वागणुकीमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, पालम येथील एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ९ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण हिंदुस्तानात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता.



























































