
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी लोकसभेवर निवडून गेल्याने गुजरातमधील राज्यसभेच्या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन जागांसाठी एकाच दिवशी पण वेगवेगळा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाला विरोध करत एकत्र मतदान घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे दोनपैकी एक जागा जिंकण्याच्या प्रयत्नात असणाऱया काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे.
गुजरातमधील राज्यसभेच्या दोन रिक्त जागांसाठी 5 जुलैला निवडणूक होत आहे. मात्र या निवडणुकांसाठी एकत्रित मतदान होणार नसल्याने काँग्रेसचे नेते आणि गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेशभाई धनानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या दोन्ही जागांवर एकत्रित मतदान घेण्याची विनंती केली होती. न्यायालयाने धनानी यांची याचिका फेटाळून लावत यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेच याचिका सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते गुजरात प्रदेश काँग्रेसचे वकील विवेक तंखा यांना केल्या. तसेच निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतरच आम्ही निवडणूक याचिकेप्रमाणे सुनावणी करू, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दोन्ही जागांवर भाजपचा सहज विजय
गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी भाजपकडे 104 जागा असून काँग्रेसकडे 77 जागा आहेत. 7 जागा रिक्त आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला प्रत्येकी 61 मते आवश्यक आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार दोन रिक्त जागांसाठी स्वतंत्र मतदान होणार असल्याने या दोन्ही जागांवर भाजप उमेदवार सहज विजयी होतील.






























































