
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राजकीय पक्षांच्या नावात धार्मिक आणि जातीवाचक शब्दांचा वापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून उत्तर मागितले आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन, इंडियन युनियन मुस्लिम लीग, हिंदू सेना यांसारख्या पक्षांच्या नावांचा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे.
वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश अनुप भंबानी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राजकीय पक्षांच्या नावात धार्मिक आणि जातीवाचक शब्दांचा वापर करण्याबाबत खंडपीठाने यावेळी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याचिकेवर 17 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
धार्मिक शब्दांचा नावात वापर करणे बेकायदेशीर
राजकीय पक्षांनी धार्मिक किंवा जातीवाचक शब्दाचा पक्षाच्या नावात वापर करणे म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायद्याचे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी राष्ट्रध्वजाचा वापर प्रतीक ध्वज म्हणून केला असून याबाबत याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.
काय म्हटले आहे याचिकेत ?
– जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर पक्षाचे नाव ठेवल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय ध्वजाचा प्रतीक म्हणून वापर करणाऱया राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, त्यांच्याकडून ठोस उत्तर मागवावे.
– देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी हे गरजेचे आहे.
– तीन महिन्यांत संबंधित राजकीय पक्षांनी पक्षाचे नाव बदलून त्यानुसार नोंदणी करावी.


























































