
पत्नी समलैंगिक असल्याचे समजल्यानंतर तिच्यावर उपचारासाठी दबाव टाकणाऱ्या पती व दोन्ही कडच्या कुटुंबीयांविरोधात महिलेने न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी महिलेला सुरक्षा पुरविण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी महिलेला पती पासून वेगळे दुसऱ्या ठिकाणी राहण्याची परवानगी दिली आहे.
सदर 23 वर्षीय समलैंगिक महिलेचे ऑक्टोबर 2019 ला एका पुरुषासोबत लग्न झाले होते. सदर महिला समलैंगिक असल्याचे तिच्या माहेरच्यांना माहित होते. तरी त्यांनी तिच्यावर भावनिक दबाव टाकत तिचे लग्न सदर पुरुषासोबत लावून दिले. लग्नानंतर तिने लगेचच पतीला तिच्या समलैंगिक असण्याबाबत सांगितले. मात्र पतीने त्याबाबत त्याच्या पालकांना सांगितले नाही.
मात्र काही दिवसांनी सदर महिला समलैंगिक असल्याचे तिच्या सासरच्या मंडळींना समजले. त्यावरून माहेर व सासरच्यांमध्ये खूप वाद झाले. वादावादीनंतर त्यांनी समलैंगिकता हा एक आजार आहे व त्यासाठी महिलेवर उपचार करू असा निर्णय घेतला. त्यानंतर ते सर्व जण मिळून महिलेवर उपचार घेण्यासाठी दबाव टाकू लागले.
त्यांच्या या दबावाला वैतागून महिला घरातून पळून गेली व ती थेट एका एनजीओत पोहोचली. त्या एनजीओच्या मदतीने तिथे तिने तिच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी याचिका दाखल केली आहे.




























































