बलात्काराचा खोटा आरोप करणाऱ्या महिलेला अंध मुलांची सेवा करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैशाच्या वादातून बलात्काराचा खोटा खटला दाखल करणाऱ्या महिलेला अंध मुलांच्या शाळेत सेवा करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. महिलेचे हे वर्तन अन्यायकारक असल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदार महिला आणि आरोपी यांच्यात मध्यस्ती करून परस्पर सामंजस्याने बलात्काराचा खटला रद्द केला. मात्र महिलेने अन्यायकारक वर्तन आणि कायद्याचा दुरुपयोग केल्याबद्दल अंध मुलांच्या शाळेत दोन महिने सेवा देण्याचे आदेश न्यायालयाने महिलेला दिले.

या प्रकरणातील आरोपीला 50 झाडे लावून त्यांची पाच वर्षे काळजी घेण्याचे आदेश न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी दिले आहेत. न्यायालयाने हे प्रकरण रद्द करताना म्हटले की, पीडित महिलेचे वर्तन अत्यंत अयोग्य आहे. यावेळी न्यायालयाने सांगितले की, महिलेने स्वत: मान्य केले आहे, की तिला मानसिक नैराश्य आले होते. महिलेला कुणीतरी दिलेल्या चुकीच्या सल्ल्याच्या आधारे तिने आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात केला.

मात्र बलात्काराचा हा आरोप खोटा ठरल्याने न्यायालयाने महिलेला समाजसेवा करण्याचे आणि अंध मुलांच्या शाळेत आठवड्यातून पाच दिवस तीन तास दोन महिने सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच आरोपीला दिल्लीच्या रोहिणी परिसरात 50 झाडे लावून त्यांची पाच वर्षे निगा राखण्याचे आदेश दिले आहेत.