
माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते जसवंत सिंह यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमामध्ये होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी राजस्थानच्या जोधपूर येथील त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
जसवंत सिंह यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात लष्करातून केली. त्यानंतर ते राजकारणात दाखल झाले. ते भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त अशा खात्यांचे मंत्रिपद त्यांनी भूषविले होते. एनडीए सरकारनंतरच्या काळात 2009पर्यंत ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. ते लोकसभेचे चार वेळा तर राज्यसभेचे पाच वेळा खासदार होते. 2014 मध्ये जसवंत सिंह यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.






























































