
दिल्लीच्या शाहदरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि 6 वर्षाच्या मुलीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मेट्रोच्या सुपरवायझर पदावर असलेल्या या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी गुगलवर ‘How To Hang’ सर्च केले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घरात ठेवलेल्या संगणकाचीही पाहणी केली, त्यावेळी त्यांना धक्कादायक माहिती हाती लागली. ज्यामध्ये सुशीलने गुगलवर ‘How To Hang’ सर्च केले होते. संगणकावर शोधल्यानंतर त्याने ही आत्महत्या केली, सुशीलने असे का केले याचे अद्याप कारण कळलेले नाही. आरोपी सुशीलने आपल्या 13 वर्षाच्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीसीआर फोनवर दुपारी 12.04 वाजता एक फोन आला. फोन केलेल्या व्यक्तीने सांगितले की, तो शाहदरा येथे राहत असून त्याने घरचा पत्ता दिला. त्याने सांगितले की, माझ्यासोबत सुशील कुमार मेट्रोमध्ये काम करतो. तो आज ऑफिसमध्ये आला नाही. मी जेव्हा त्याला फोन केला त्यावेळी तो रडत होता. त्याने सांगितले की, मी घरात सर्वांना मारुन टाकले, आता तो फोन उचलत नाहीय.
पोलिसांनी तो फोन लगेच व्हेरिफाय केला. पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जिथे त्यांना तीन लाोकांचे मृतदेह सापडले. पोलिसांच्या माहितीनुसार, सुशील याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. तो मेट्रोमध्ये सुपरवायझर पदावर नोकरी करत आहे. तिथे त्याची पत्नी अनुराधा आणि मुलीच्या शरीरावर चाकूने केलेल्या जखमा दिसत आहेत. आधी त्याने त्याच्या कुटुंबियांची हत्या केली आणि नंतर गळफास घेत आत्नहत्या केली. त्याने आपल्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने तो बचावला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
























































