
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या आम आदमी पार्टी सरकारने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन एक महत्वाची घोषणा केली आहे. महिलांना यापुढे मेट्रो आणि सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा सोमवारी दिल्ली सरकारतर्फे करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही खूशखबर महिलांना दिली.
दिल्लीत महिलांना असुरक्षित वाटत आहे. याचपार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने महिलांसाठी दोन महत्वाचे निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. याअंतर्गत यापुढे दिल्ली मेट्रो आणि दिल्ली परिवहन मंडळाच्या बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. अनेकदा सार्वजनिक वाहनांच्या तिकिटाचा दर जास्त असल्याने खासगी वाहनांचा पर्याय महिला निवडतात. त्यामुळे सार्वजनिक वाहनांमधून महिलांना प्रवास करणे सोपे जावे हा यामागचा उद्देश असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच ज्या महिला आर्थिक सक्षम आहेत तिकीट विकत घेऊन प्रवास करू शकतात. अशा महिलांनी सरकारी सबसिडीचा वापर करू नये यासाठीही त्यांना प्रोत्साहित केले जाईल. दोन ते तीन महिन्यात ही मोफत सेवा सुरू होणार आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉरपोरेशन यासाठी सहाय्य करणार असल्याचेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
Delhi CM Arvind Kejriwal: On all DTC buses, cluster buses and metro trains women will be allowed to travel free of cost so that they have a safe travel experience and can access modes of transport which they were not able to, due to high prices. pic.twitter.com/KVqEWDIJAS
— ANI (@ANI) June 3, 2019



























































