#CAA दिल्लीत 16 मेट्रो स्टेशन बंद, संपूर्ण दिल्लीत 144 लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात दिल्ली येथील आंदोलन तीव्र झालं असून त्याचे पडसाद दिल्लीतील मेट्रो वाहतुकीवरही उमटले आहेत. दिल्लीत ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची झळ बसू नये, म्हणून दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने 16 मेट्रो स्टेशन बंद केली आहेत. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी संपूर्ण दिल्लीत 144 कलम लागू करण्यात आलं आहे.

लाईव्हमिंटने दिलेल्या वृत्तानुसार, पटेल चौक, लोक कल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगती मैदान, सेंट्रल सेक्रेटरीएट, खान मार्केट, वसंत विहार, मंडी हाऊस या मेट्रो स्थानकांची प्रवेशद्वारं आणि निकासद्वारं बंद ठेवण्यात आली आहेत. यापूर्वी लाल किल्ला, जामा मशीद, चांदनी चौक आणि विश्वविद्यालय या मेट्रो स्थानकांची द्वारं बंद करण्यात आली होती. आता, जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग आणि मुनिरका या मेट्रो स्टेशन्सनाही बंद करण्यात आलं आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात शीघ्र कृती दलाची पथकं दाखल झाली आहेत.

आंदोलनकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत असून सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे देशभरात हे आंदोलनाचं लोण पसरलं असून कर्नाटक, बिहार, हैदराबाद, चंदिगड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही आंदोलन सुरू आहे.