वाहतूकीचे नियम पाळा, नाहीतर दहापट दंड भरा!

200

सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली

बहुचर्चित मोटार वाहन दुरुस्ती विधेयक बुधवारी प्रदीर्घ चर्चेनंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. वाहतुकीचे नियम मोडणे आता चांगलेच महाग पडणार आहे. किमान चारपट ते कमाल दहापट दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. ‘हिट अँड रन’ मधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांपर्यंत भरपाई मिळणार आहे. दारू पिऊन गाडी चालविल्यास 2 हजारांऐवजी 10 हजार रूपये दंड आकारला जाईल. हेल्मेट नसेल तर 100 रुपयांऐवजी 1000 रूपये दंड द्यावा लागेल. गाडीचा इन्शुरन्स नसल्यास 2000 रुपये भरावे लागतील.

मोटार वाहन दुरुस्ती विधेयक -2019 वर प्रदिर्घ चर्चा झाली. चर्चेनंतर विधेयकावर मतदान झाले. 108 विरूद्ध 13 मतांनी विधेयक मंजूर करण्यात आले. चर्चेला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशातील वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी विधेयकात भर देण्यात आल आहे. मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे रस्ते सुरक्षेच्या सध्याच्या कायद्यात बदल करणे आवश्यक आहे.

काय आहेत तरतुदी?
लायसन्स नसल्यास सध्या 500 रुपये दंड आकारला जातो. आता दंडाची रक्कम 5 हजार रुपये करण्यात आली आहे. रॅश ड्रायव्हींग करणाऱयांना 5 हजार रूपये दंड आकारणार. सीट बेल्ट न वापरल्यास 1 हजार रूपये दंड घेतला जाईल. तसेच झेब्रा क्रॉसिंगसह इतर वाहतूक नियम मोडल्यास 100 ऐवजी 500 रुपये दंड आकारला जाईल. रुग्णवाहिकेस रस्ता न दिल्यास 10 हजारांचा दंड केला जाईल. अल्पवयीन मुलाने गाडी चालविल्यास गाडीच्या मालकास 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षे कारावासाची शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या