रणबीर-आलियाही लवकरच बोहल्यावर चढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सध्या बॉलीवूडमध्ये नवीन चित्रपटांपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती रणवीर-दीपिका आणि प्रियांका-निकच्या लग्नाची. पण आता यात अजून एका जोडप्याच्या नावाची भर पडली आहे. ते जोडपं आहे रणबीर-आलिया. रणबीर आलियाही या वर्षाअखेर बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे, असं त्यांच्या निकटवर्तीयानं सांगितलं आहे.

आलियाला रणबीर आधीपासूनच आवडतो, असं सांगण्यात येतं. पण त्यांच्यात जवळीक झाली ती अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटादरम्यान. चित्रीकरणाच्या निमित्ताने हे दोघं वरचेवर भेटू लागले. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि बघता बघता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नात रणबीर-आलिया एकत्र आले होते. त्यावरून त्यांच्यात नक्कीच काहीतरी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली होती. याबद्दल रणबीरला विचारता त्याने तर आमचं नातं आताच कुठे खुलतयं असं सांगून प्रेमाची कबुलीच दिली होती.

रणबीरच्या कुटुंबीयांनाही आलिया पसंत आहे. अमेरिकेत उपचार घेत असलेल्या रणबीरच्या वडिलांना ऋषि कपूर यांना भेटण्यासाठी ती अमेरिकेतही गेली होती. तिथे रणबीरबरोबर तिने बराचवेळ घालवला. या क्षणाचे फोटोही तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते.

त्यातच रणवीर-दीपिका नोव्हेंबरमध्ये तर प्रियांका-निक डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचे जाहीर झाले आहे. यामुळे रणबीर-आलियाच्या चाहत्यांना ते दोघं केव्हा लग्न करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. यावर बोलताना कपूर कुटुंबीयांच्या एका निकटवर्तीयाने हे दोघं या वर्षाअखेर किंवा 2019 मध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे.