
आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात अडकलेल्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना भेटायला काँग्रेस नेते शशी थरूर सोमवारी तिहार कारागृहात गेले होते. थरूर यांच्यासोबत त्यावेळी चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ती चिदंबरम हेही होते.
आयएनएक्स घोटाळ्याच्या संदर्भात चिदंबरम यांना सर्वप्रथम सीबीआयने 21 ऑगस्ट रोजी अटक केली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांना 16 ऑक्टोबर रोजी अटक केली. तेव्हापासून 27 नोव्हेंबरपर्यंत ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाने चिदंबरम यांची याचिका फेटाळणाऱया उच्च न्यायालयाच्या 16 नोव्हेंबरच्या निर्णयाला आव्हान देणाऱया त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना ईडीला नोटीस बजावली होती. यासंदर्भात आपण 25 नोव्हेंबरपर्यंत याबाबत उत्तर देऊ, असे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार आहे.



























































