व्हॉट्सऍपची नवीन चार फीचर्स येणार

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

व्हॉट्सऍप हे संपर्काचे अलीकडे एकमेव साधन होऊन बसले आहे. पण या मेसेंजिंग ऍपचा अनुभव युजर्सना आणखी चांगला घेता यावा यासाठी त्यात आणखी चार नवीन फीचर्स लवकरच दाखल होणार आहेत असे कळते. आताच हे ऍप वापरणाऱयांची संख्या दीड अब्जांवर पोहोचली आहे. व्हॉट्सऍपवर आता डार्क मोड, ऑनलाइन स्टेटस लपवणे आणि पैशांची देवाणघेवाण अशा चार फीचर्सची भर पडणार आहे.

खूप रात्रीपर्यंत व्हॉट्सऍपवर मेसेज पाहात आणि त्यांना उत्तरे देत आजच्या तरुणाईचा बराच वेळ जात असतो. यामुळे त्यांच्या डोळ्यांना इजा पोहोचू शकते याची कल्पना व्हॉट्सऍपच्या निर्मात्यांनाही आहे. त्यामुळेच डार्क मोड आणला जाणार आहे. यामुळे डोळ्यांवर कमी ताण पडणार असून हा मोड रात्रीच्या वेळी खूपच फायद्याचा ठरणार आहे. यासोबतच नवीन चार फीचर्समध्ये ऑनलाइन स्टेटस हाईड करता येणार आहे. या फीचरमुळे तुम्ही ऑनलाइन असलात तरी इतर लोकांना तुमचे लास्ट सीन, रीड आणि रिसीप्ट स्टेटस दिसणारच नाहीय.