आळंदीत अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदीची मागणी; सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिसांना विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदीतील वडगाव रस्त्यावर गेल्या आठ दिवसांत दोन अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक, भाविक, शालेय मुले यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिक, भाविक,शालेय मुले यांच्या सुरक्षिततेसाठी तीर्थक्षेत्र आळंदीतून होणारी दिवसा अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आळंदी पोलीस ठाणे आणि आळंदी नगरपरिषदेला निवेदन देत करण्यात आली असल्याची माहिती खेड तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे यांनी दिली.

या संदर्भात निवेदन देत राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांचे लक्ष वेधले आहे. गेल्या आठ दिवसांत आळंदी – वडगाव रस्त्याला दोन अपघात झाले. यात एका युवक वारकरी विद्यार्थ्याचा तसेच एक चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. हे अपघात अवजड वाहनांमुळे झाले. येथे वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची वाढती वर्दळ आणि बेशीस्त वाहन चालक यामुळे नागरिक, भाविक, वारकरी तसेच शालेय मुलांची रहदारी आणि प्रवास धोकादायक झाला आहे. सर्वांची सुरक्षितता महत्वाची असून वाढत्या रहदारीला शिस्त लावण्याची उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आळंदी हे तीर्थक्षेत्र तसेच लगत उद्योग व्यावसायिकांची, कंपन्यांची वाहने तसेच सार्वजनिक खाजगी कामगार वाहतूक करणारी मोठी वाहने यांची वर्दळ खूप आहे. अवजड वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत . वाहन चालविताना वर्दळीचे मार्गावर शाळा,दवाखाना, शासकीय कार्यालय या भागातून जाताना शांतता झोनचे फलक लावण्यात यावेत अशी ही मागणी करण्यात आली आहे. बेशीस्त वाहन चालवून वाहन चालक अपघातास कारणीभूत ठरत आहेत. आळंदी तीर्थक्षेत्र असल्याने अवजड वाहनांना दिवसा बंदी असून त्या प्रमाणे कार्यवाही व्हावी. तसेच वाहतूक साक्षरता प्रभावी पणे राबविण्यासह वर्दळीचे चौकात मोठ्या प्रमाणात शासन निर्णया प्रमाणे गतिरोधक रस्ते राष्ट्रीय मानांकन प्रमाणे विकसित करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भातील निवेदन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी स्वीकारले. यावेळी आळंदी नगरपरिषद माजी विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुष्पा कुऱ्हाडे, आळंदी महिला शहर अध्यक्षा रूपाली पानसरे, अरिफ भाई शेख, शहर उपाध्यक्ष सतीश कुऱ्हाडे, शिवस्मृती प्रतिष्ठानचे अमित कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. या शिष्ठ मंडळाचे नेतृत्व खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे यांनी केले.