
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने कर्ज काढावे, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज न काढता विशेष महाराष्ट्र राज्य लॉटरीची सोडत काढावी, अशी मागणी राज्यातील काही लॉटरी विक्रेते आणि विक्रेत्यांच्या संघटनांनी केली आहे. सदर लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यासाठी जनतेला आवाहन केल्यास तिकीटविक्रीतून मोठा निधी उभा राहू शकतो. त्यामुळे सरकारला कर्ज काढावे लागणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कारगील युद्ध आणि गुजरात भूकंपावेळी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने विशेष लॉटरीची सोडत काढली होती. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने विशेष सोडत काढावी. उद्योगपती, सिने कलाकारांना जास्तीत जास्त तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन करावे, अशी मागणी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी केली आहे. तर बँका, सिनेमागृह, बसस्थानक, रुग्णालये, सरकारी इमारती आदी गर्दीच्या ठिकाणी या तिकिटांची सरकारमार्फत विक्री करावी, त्याबाबत प्रसिद्धीही करावी. या लॉटरीमुळे तिकिटांची विक्री करणाऱ्यांना चांगला मोबदला मिळणार असून गरजूंना रोजगार मिळेल, असे गिरगाव येथील अंबेमाता लॉटरी एजन्सीचे सुरेश भगत यांनी म्हटले आहे.
























































