डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूचे संकट वाढले! आठवडय़ात दुपटीहून जास्त रुग्णवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार बरसायला सुरुवात केल्याने पावसाळी आजारही आणखी बळावले आहेत. मागील एकाच आठवडय़ात मलेरिया, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये दुपटीपेक्षा जास्त तर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पावसाळी आजार वाढल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले आहे.

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. यातच पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना केल्या असतानाही हे आजारही वाढत आहेत. गेल्या आठवडय़ात मलेरिया रुग्णांची संख्या 218 वरून 412 वर गेली आहे. तर लॅप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, हिपेटायटिस, चिकनगुनिया आणि स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या अनुक्रमे 16, 46, 118, 10, 1 आणि 58 इतकी वाढली आहे. पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

स्वच्छता राखा
पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून दीड हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. शिवाय घरोघरी तपासणी आणि औषध-गोळय़ांचे वाटपही करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी
स्वाइन फ्लू आजारात ताप, कफ, घशात इन्फेक्शन, शरीर जखडणे, डोकेदुखी, अतिसार, उलटी अशी लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांजी संपर्क साधावा. तर शिंकताना, खोकताना नाकावर रुमाल पकडावा, वेळोवेळी हात साबण पाण्याने स्वच्छ धुवावेत, डोळे-कान-तोंडाला वारंवार स्पर्श करू नये, गर्दी टाळावी.

रुग्णांची आकडेवारी
मलेरिया 412
लेप्टो 29
डेंग्यू 73
गॅस्ट्रो 237
हिपेटायटीस 26
चिकनगुनिया 2
‘एच 1 एन 1’ 138