
वाढतं वजन ही अनेकांसाठी खूप मोठी समस्या असते. वजनासोबत जडणारे विविध आजार किंवा भेडसावणाऱ्या समस्या यांना टाळण्यासाठी बरेच उपाय केले जातात. त्यात कमी खाणे हा एक प्रमुख उपाय असतो. अशा वेळी कित्येकदा आपण तोंडाला कुलूप घालायला हवं, असं गंमतीने म्हणतो. पण, हीच गोष्ट शास्त्रज्ञांनी खूप गांभीर्याने घेतली आहे.
न्यूझिलँडच्या ओटागो विद्यापीठ आणि ब्रिटनच्या संशोधकांनी चक्क तोंडाला लावायचं कुलूप शोधलं आहे. या कुलुपामुळे मानवी जबडा संपूर्णपणे लॉक होऊ शकतो.
या कुलुपाचा वापर तोंड बंद ठेवायला केला जाऊ शकतो. या कुलुपात चुंबकाचा वापर केला गेला आहे. या उपकरणाला डेंटलस्लिम डाएट कंट्रोल डिवाईस असं नाव आहे.

हे कुलुप दाताच्या डॉक्टरांच्या मदतीने आपल्या जबड्यातील वरच्या आणि खालच्या दातांना लावलं जातं. या उपकरणाच्या दोन्ही बाजूंना चुंबक आहे. त्यामुळे जबडा उघडल्यानंतर तो ताबडतोब बंद होतं.
या कुलुपाला दातावर बसवल्यानंतर माणूस फक्त दोन मिलिमीटर इतकंच तोंड उघडून द्रव पदार्थ सेवन करू शकतो. अर्थात या उपकरणाचा बोलताना आणि श्वास घेताना काहीही त्रास होणार नाही. ज्यांच्यावर या उपकरणाचा प्रयोग केला गेला त्यांच्या वजनात दोन आठवड्यात 6.36 किलो इतकी घट पाहण्यात आली.
हे उपकरण बसवण्यासाठी किंवा काढण्यासाठी डेंटिस्टची मदत घ्यावी लागेल. वजन कमी करण्याचं ध्येय साध्य झालं की ते काढूनही ठेवता येईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.




























































