अजितदादांच्या अडचणी वाढणार, लवासाप्रकरणी हायकोर्टात 21 जुलैला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधी पक्षातून सत्तेत गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागील अडचणींचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कथित लवासा घोटाळा प्रकरणात अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार सत्तेत आल्यामुळे ते लवासा घोटाळ्याशी संबंधित पुराव्यांमध्ये फेरफार करतील, अशी भीती व्यक्त करीत या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाला तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून 21 जुलैला सुनावणी निश्चित केली आहे.

कथित लवासा घोटाळा प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करीत मूळ याचिकाकर्ते अॅड. नानासाहेब जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती अॅड. जाधव यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाला केली. ती न्यायालयाने मान्य केली. हे प्रकरण वर्षभरानंतर पुन्हा सुनावणीसाठी पुढे येत असल्यामुळे अजित पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.