
मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाने रायगड जिल्ह्यातील मागूर मत्स्यसाठ्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरु केली आहे. पनवेल, खालपूर तालुक्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. खालापूर तालूक्यातील महड व माजगाव गावातील अंदाजे 4500 किलो मासळी खड्डयात टाकून नष्ट करण्यात आली. नवी दिल्लीतील राष्ट्रीय हरीत लवाद यांनी 22 जानेवारी 2019 च्या आदेशान्वये विदेशी मागूर (क्लेरीअस गरिपिनिअस) या प्रजातीच्या माशांचे देशातील मत्स्यसाठे नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने कारवाई सुरु करण्यात आली आहे.
पनवेल तालूक्यातील पनवेल, कामोठे, खारघर आणि तळोजे येथील मासळी विक्री केंद्रास भेट देण्यात आली. यावेळी कामोठे येथील एक व तळोजा येथील आठ मत्स्यविक्रेते मागूर माशांची विक्री करताना आढळले. या विक्रेत्यांना नोटीस देण्यात आली असून या माशांची या पुढे विक्री करू नये अशी समज देण्यात आली. खालापूर तालूक्यातील या विभागाच्या पथकाने पाहणी केली असता महड गावातील एका मत्स्यसंवर्धकाच्या तलावामध्ये प्रतिबंधित मागूर मत्स्यसाठा आढळला. या मत्स्यसंवर्धनास यापूर्वी नोटीस देऊनही मत्स्यसाठा नष्ट केला नव्हता. त्याअनुषंगाने या कार्यालयाच्या पथकाने मत्स्यसंवर्धन तळ्यांच्या बाजूला खड्डा खणून अंदाजे 3000 किलो मासळी खड्डयात टाकून नष्ट करण्यात आला. खालापूर तालुक्यातील माजगाव येथील एका मत्स्यसंवर्धकाच्या तलावावर अशाचप्रकारे मागूर माशांचा मत्स्यसाठा आढळल्याने अंदाजे 1500 ते 1700 किलो मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला.
राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशान्वये विदेशी मागूर माशांचे मत्स्यसंवर्धन व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणीही या माशांचे संवर्धन करू नये . प्रतिबंधित मागूर माशांचे संवर्धन अथवा विक्री करताना कोणी आढळल्यास मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त यांनी आवाहन केले आहे.






























































