
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्तीसाठी दोघांनीही एकाच दिवशी वेगवेगळे आदेश जारी केले आहेत. फडणवीसांच्या सामान्य प्रशासन विभागाने आशीष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे तर शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या आदेशामध्ये अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे म्हटले आहे. शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये समन्वय नसल्याचा हा सरकारी कागदोपत्री पुरावाच म्हटला जात आहे.
एस. श्रीनिवास हे 31 जुलै रोजी निवृत्त झाले. त्यांच्याकडे एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक पद होते. तसेच बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. श्रीनिवास यांच्या निवृत्तीनंतर बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार कुणाकडे द्यायचा यावरून फडणवीस आणि शिंदे यांच्यात चढाओढ सुरू होती.
नगरविकास विभागाने 5 ऑगस्ट रोजी आदेश जारी करून बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवला. त्याच दिवशी सामान्य प्रशासन विभागानेही आदेश जारी केला. त्यानुसार वस्तू व सेवाकर आयुक्त आशीष शर्मा यांच्याकडे बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला.
सरकारचे बेस्टकडे लक्ष नाही हे सिद्ध झाले, बेस्ट कामगार सेनेची टीका
बेस्टला पूर्ण वेळ आणि कायमस्वरूपी महाव्यवस्थापक द्या, असे पत्र बेस्ट कामगार सेनेने सरकारला दिले होते. पण सरकारचे बेस्टकडे लक्षच नाही. बेस्टमध्ये सावळागोंधळ असल्याने कुणीही आयएएस अधिकारी पदभार स्वीकारण्यास तयार नाही हे परत एकदा सिद्ध झाले आहे, हे सरकारचे मोठे अपयश आहे, अशी टीका बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली. अश्विनी जोशी यांनी बेस्टचा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला असावा म्हणूनच उशिरा रात्री दुसऱया विभागाकडून आदेश जारी करून आशीष शर्मा यांच्याकडे कार्यभार दिला गेला असावा, असे सामंत यांनी म्हटले आहे. शर्मा यांच्याकडे आधीच वस्तू व सेवाकर आयुक्त पदाच्या कामाचा प्रचंड भार असताना त्यांना अतिरिक्त कारभार दिला जातो म्हणजे सरकारचे बेस्टकडे गांभीर्याने लक्षच नाही, बेस्ट संपवायचा हा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सामान्य प्रशासन विभागाचे 31 जुलै, 2025 रोजीचे आदेश विचारात घेता ‘बेस्ट वर्कर्स युनियन’ या कामगार संघटनेचा मोर्चा हाताळण्याच्या दृष्टीने महाव्यवस्थापक, बेस्ट या पदाचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्याबाबत कार्यवाही करण्यात येत होती. जोशी यांच्याकडे कार्यभार सोपविण्याचे आदेश निर्गमित केलेले नाहीत, अशी सारवासारव नगरविकास विभागाने केली.
हे अहंकार युद्ध, आदित्य ठाकरे यांची टीका
फडणवीस आणि गद्दारनाथ मिंधे यांच्यातील समन्वय संपल्यामुळेच ‘बेस्ट’ महाव्यवस्थापकांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. मात्र यांच्यातील या अहंकारी युद्धाचा त्रास महाराष्ट्राने का सहन करावा असा टोला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला. जर मुख्यमंत्री आणि गद्दारनाथ मिंधे यांच्यातील बेसिक संवादच मेला असेल तर हे लोक राज्याचे नेतृत्व कसे करणार, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
हे डबल गँगवॉर, हर्षवर्धन सपकाळ यांचा निशाणा
1 पद, 2 आदेश, 2 नेते… हे डबल इंजिन सरकार आहे की डबल गँगवॉर? अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. फडणवीस आणि शिंदे यांच्यात बदल्यांवरून गँगवार सुरू आहे. एका पदासाठी एकाच दिवशी फडणवीस व शिंदे यांनी दोन अधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मलाईदार पदावर ‘आपलाच माणूस’ बसविण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष पाहता सरकार आहे की टोळीयुद्ध असा प्रश्न जनतेला पडला आहे, असे ते म्हणाले.