फडणवीसांना जात आठवली, मी ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातंय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझी जात ब्राह्मण असल्यामुळेच विरोधक मला टार्गेट करतात. कोणत्याही गोष्टीचे खापर माझ्यावर फोडून मोकळे होतात. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. हा राज्याचा कायदा असल्याने उगाच केंद्राकडे बोट नको, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपची भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाबाबत संभ्रम करणारी वक्तव्य टाळणे गरजेचे आहे. मात्र काही लोकं राजकीय हेतूने कसे केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहत आहेत. केंद्राला पक्षकार करणे याचिकाकत्र्यांच्या हातात आहे, पण त्याचा काही उपयोगही नाही. केंद्राकडे बोट दाखवणे ही पळवाट ठरेल, असे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्यदैवत आहेत. त्यांच्या वंशजांबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे. त्यामुळे त्यांच्यात कोणी फूट पाडू नये, असे मत फडणवीस यांनी मराठा समाजाचे नेतृत्व कोणी करावे यासंबंधी बोलताना व्यक्त केले.

कुंभकोणीऐवजी थोरांतांकडे केस द्यावी

आरक्षणासंदर्भात आपण सगळे निकष पूर्ण केलेत का? हे आपल्याला न्यायालयाला सांगायचे आहे. सगळ्यांची एकत्र सुनावणी होत असताना आम्हाला स्थगिती का? हा मुद्दा आपण आता मांडायला हवा. इतर राज्यांप्रमाणे आपलाही कायदा टिकायला हवा. अध्यादेशाबाबत विधितज्ज्ञांसोबत चर्चा केली जाऊ शकते. कुंभकोणींऐवजी थोरातांकडे केस द्यावी. त्यांनी उच्च न्यायालयात केस जिंकली होती, असे फडणवीस म्हणाले.