फडणवीस आणि अजितदादा समर्थक आपसात भिडले

राज्यातील तिघाडी सरकारमधील बिघाडी पुन्हा उघड जाहीर झाली असून, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे समर्थक भिडले आहेत. एकमेकांवर लबाड लांडगा, पाळलेला कु XX अशी खालच्या पातळीवर टीका सुरू केली आहे.

अजित पवार लबाड लांडग्याचं लाबड पिल्लू – पडळकर

धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. त्यांना आम्ही मानत नाही आणि आम्ही कधी पत्रही दिले नाही. यापुढेही अजित पवारांना पत्र देण्याची आवश्यकता नाही, अशी टीका फडणवीस समर्थक भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्दय़ावरून केलेल्या वक्तव्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली. ही लबाड लांगडय़ाची लेक बोलतेय. त्यावर फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही, असे पडळकर म्हणाले.

फडणवीसजी, तुमचा पाळलेला कु xx, गोप्याला आवर घाला – मिटकरी

पडळकरांच्या टीकेनंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘गृहमंत्री फडणवीसजी मी विनंती करतो, तुमचा तो पाळलेला कु ऑऑ गोप्या हा लायकीपेक्षा जास्त भूंकतोय. ज्यांची ख्याती मंगळसूत्र चोर अशी आहे. जो समाजाचा होऊ शकला नाही. जो आपल्या जन्म देणाऱया आईचा, सख्ख्या भावाचा, देवाचाही होऊ शकला नाही, अशा गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावी, वेसण घालावी, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. राजरोसपणे अजित पवारांवर तोंडसुख घेणाऱया गोप्याला तुम्ही आवर घालणार नसाल तर आम्हाला आवरणे तुमच्यासाठी कठीण होईल. ही आमची सूचना आहे. गोप्यासारख्या रानऑऑऑ वेळीच आवर घाला, असा इशारा मिटकरी यांनी फडणवीस यांनाच दिला आहे.

पडळकर विकृत माणूस – तटकरे

गोपीचंद पडळकर हा विकृत माणूस आहे. अजित पवारांवर पातळी सोडून बोलणाऱया पडळकरांची तक्रार आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.