
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर भास्कर जाधवांनी आपल्याला बोलण्याची संधी दिली जावी यासाठी हात वर केला. दरम्यान, इतर अनेक सदस्य एकापाठोपाठ एक त्यांचे मुद्दे मांडत होते. त्यावर भास्कर जाधव संतापले. आपल्याला संधी मिळावी असे ते म्हणाले. अध्यक्षांशी आपले व्यक्तिगत वैर नाही, अनेकदा आपण त्यांच्या दालनात जातो, चहा पितो, आपल्याकडील वेडावाकडा अनुभव शेअर करतो, असे जाधव म्हणाले. त्यावर यापुढे भास्कर जाधवांना चहाबरोबर गोड केकही खाऊ घाला, असे फडणवीस मिश्किलीने म्हणाले.
…हे सर्व विरोधी पक्षनेते पदासाठी
खतांच्या किमती आणि बोगस बियाण्यांच्या मुद्दय़ावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आज तुफान खडाजंगी झाली. कृषिमंत्री धनजंय मुंडे बोलत असतानाच बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण हे प्रतिप्रश्न उपस्थित करत होते. थोरात आणि पटोले आक्रमक झाले होते. या सर्व चर्चेत भाजप नेते आशीष शेलार यांनी हस्तक्षेप केला. विरोधकांची ही बोंब विरोधी पक्षनेते पदासाठी आहे. आधी विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निपटवा. मग सगळे शांत बसतील, असे शेलार म्हणाले. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शेलार यांना समज देत विषयाबाबतच बोला, अशी तंबी दिली.





























































