देवगड- कोल्हापूर एसटी फेरी पहाटे 5 वाजता सुरु करावी, तालुका व्यापारी संघाची मागणी

कोल्हापूरकडे सकाळी 5 वाजता जाणारी एसटी फेरी देवगड आगारातून सुरू करावी अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन देवगड तालुका व्यापारी संघाच्यावतीने स्थानकप्रमुख लहू सरवदे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, दयानंद पाटील, मिलींद मोहिते, सागर गावकर, सनित आचरेकर, निलेश कारेकर आदी उपस्थित होते.

देवगड तालुक्यातील बहुतांशी वैद्यकीय सुविधा, व्यापारविषयक सुविधा कोल्हापूर जिल्ह्याशी निगडीत आहेत. त्यामुळे देवगडहून कोल्हापूरकडे जाण्यासाठी सकाळी गाडी उपलब्ध होणे गरजेचे आहे. आजपर्यंत सकाळी पाच वाजता जाणारी देवगड रत्नागिरी या एसटीने प्रवाशीवर्ग तळेरेपर्यंत जात होता तेथून मिळेल ती गाडी पकडून कोल्हापूरला जात असे. मात्र देवगड रत्नागिरी पाच वाजता सुटणारी फेरी रद्द करण्यात आली. त्याचा फटका कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशी व व्यापारीवर्गाला बसला आहे.

देवगडहून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांना सकाळी गाडीची सोय उपलब्ध नाही. दरम्यान देवगड आगारातून कोल्हापूरमार्गे देवगड अक्कलकोट व देवगड तुळजापूर या मार्गाने जातात. यापैकी एका फेरीची वेळ बदलून सकाळी पाच वाजता करावी अथवा स्वतंत्र बस फेरी उपलब्ध करून त्याची वेळ सकाळी पाच वाजता असेल अशी ठेवावी जेणेकररून व्यापारीवर्गाला कोल्हापूरला सकाळी वेळेत पोहचता येईल. यादृष्टिने योग्य निर्णय घेवून व्यापारी व प्रवाशीवर्गाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे आगारव्यवस्थापकांना करण्यात आली.