
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खारेपाटण गावात बाजारपेठेसह पूर्ण गाव बंद ठेवण्यात आले. खारेपाटण बाजारपेठेत गुरुवारी सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता. पुढील आठ दिवस खारेपाटण बाजारपेठ बंद राहणार असल्याचे ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी सांगितले. खारेपाटण गावातील नागरिक, व्यापारी बांधव आरोग्यविभाग व स्थानिक ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयात सामूहिक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये 22 ते 29 एप्रिल या आठ दिवसांच्या कालावधीत खारेपाटण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

























































