
मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली होती. अनेक महिन्यानंतर शुक्रवारी पंढरीत वारीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यातील सर्वात मोठी गर्दी शुक्रवारी एकादशीनिमित्त जमली होती.
या महिन्यात विठुरायाचा मुक्काम गोपाळपूर येथील विष्णुपदावर असतो. यामुळे मंदिरातील देवासह पदावरदेखील दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णुचा आवडता महिना म्हणून धर्मग्रंथात उल्लेख आढळतो. या महिन्याच्या एकादशीलाच श्रीकृष्णाने अर्जुनास गीता सांगितली होती. यामुळे गीता जयंतीची पर्वणी, विष्णुपदाचे दर्शन असा दुहेरी योग साधण्यासाठी भाविकांनी पंढरीत गर्दी केल्याचे चित्र होते. चंद्रभागेच्या काठावरील विष्णूपद येथे देखील दुरूनच दर्शन ठेवण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन दुरूनच आहे. तसेच ऑनलाईन दर्शन बुकींग करणार्यांनाच दर्शनास सोडले जाते. मंदिर समितीने एका तासाला 450 भाविकांना सोडण्याचे नियोजन केले असल्याने दिवसभरात सहा हजार जणांना दर्शनाचा लाभ मिळत आहे. मात्र, एकादशीनिमित्त ऑनलाईन बुकींग न केलेल्या हजारो भाविकांनी देखील केवळ कळस दर्शन व विष्णुपदाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. संत नामदेव पायरी, चंद्रभागेचे वाळवंट तसेच प्रदक्षिणा मार्ग येथे भाविकांची मोठी गर्दी होती.
नाताळानिमित्त शुक्रवार, शनिवार व रविवार अशी सलग तीन दिवस सुट्टी आल्याने देखील भाविकांची संख्या वाढली आहे. आणखी दोन दिवस गर्दी कायम राहू शकते. यामुळे पंढरीतील व्यापार्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाची अनलॉक प्रक्रीया सुरू झाली असली तरी मंदिर परिसरातील व्यापार्यांना याचा फारसा फायदा झाला नव्हता. देवाचे दर्शन खुले नसल्याने अद्याप पंढरीत भाविकांची गर्दी तुरळकच असते. मात्र मोक्षदा एकादशीमुळे आठ महिन्यानंतर व्यापारी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.




























































