
सामना प्रतिनिधी । वाशीम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, गरीब सवर्णांनाही आरक्षण देण्यात आले, मात्र धनगर समाजच आरक्षणापासून वंचित आहे. भाजपने आपला शब्द न पाळल्यास त्यांना सत्ता गमवावी लागेल असा घरचा आहेर भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिला.
वाशीम येथे धनगर समाज महामेळावा आयोजित करण्यात आला होता. महात्मे म्हणाले सरकारने मराठा समाजाला 16 टक्के, गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण दिले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लटकला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने समाजाचा विश्वासघात केला. समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. भाजपने आरक्षण देण्याचा शब्द दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले पण सरकारने आरक्षण देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. आरक्षण दिले नाही तर धनगर समाज त्यांनाही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा डॉ. विकास महात्मे यांनी दिला.





























































