
>> धनंजय कुलकर्णी
मागच्या आठवडय़ात अमेरिकेच्या टाईम मॅगझिनने जगभरातील मागील ‘शंभर वर्षांतील सर्वोत्कृष्ट शंभर’ चित्रपटांची यादी जारी केली. यात आपल्या सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’ हा चित्रपट 55व्या क्रमांकावर आहे. या यादीतील हा एकमेव हिंदुस्थानी चित्रपट आहे. त्यानिमित्ताने या सिनेमाबद्दल…
हिंदुस्थानातील अभिजात चित्रपटांचा जेव्हा आपण विचार करू लागतो त्यावेळी एक नाव प्रामुख्याने आपल्या नजरेसमोर येते ते म्हणजे 1955 सालचा ‘पाथेर पांचाली!’ महान बंगाली साहित्यिक विभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी 1929 साली लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर सत्यजित रे यांनी हा चित्रपट बनवला. 26 ऑगस्ट 1955 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभर समीक्षकांनी गौरवले. जागतिक सिनेमाच्या परिप्रेक्षात हिंदुस्थानी सिनेमाची खऱया अर्थाने ओळख या चित्रपटाने झाली. आज जवळपास 70 वर्षांनंतरही या सिनेमाची आठवण आणि नोंद जगभरातील रसिक ठेवतात. जगभरातील सिनेअभ्यासक या कलाकृतीच्या विविध पैलूंवर संशोधन करतात. अनेक फेस्टिवल्समधून आजही हा सिनेमा आवर्जून दाखवला जातो. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाला प्राप्त झाले आहेत आणि मुख्य म्हणजे अस्सल हिंदुस्थानी मातीतील कथेला योग्य न्याय देत रुपेरी पडद्यावर आणले. हेच या सिनेमाच्या अभिजाततेचे द्योतक आहे. नुकतेच अमेरिकेच्या टाईम मॅगझिनने मागच्या शंभर वर्षांतील सर्वोत्कृष्ट शंभर चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. त्यात एकमेव हिंदुस्थानी सिनेमाचा समावेश झालेला आहे आणि तो म्हणजे ‘पाथेर पांचाली!’ सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट. या सिनेमांमध्ये सुधीर बॅनर्जी, करुणा बॅनर्जी, कनू बॅनर्जी, उमा दासगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे नयनरम्य छायाचित्रण सुब्रता मित्रा यांनी केले होते तर संकलन दुलाल दत्ता यांनी केले होते आणि संगीत पंडित रविशंकर यांचे होते.
आज इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाचा रसिकांच्या मनावर अवीट ठसा का उमटवला जातो याचे उत्तर शोधू लागतो तेव्हा सत्यजित रे या दिग्दर्शकाने या चित्रपटावर घेतलेली मेहनत आपल्या लक्षात येईल. यात कुठलाही मोठा संघर्ष नाही, लंबेचौडे डायलॉग नाहीत, चटकदार प्रसंग नाहीत, क्षोभ नाटय़ नाही. साधेपणा हाच या चित्रपटाचा आत्मा आहे. कादंबरीतील मूळ कथानकाशी प्रामाणिक राहात, कथेच्या आशयाला कुठेही बाधा न आणता अतिशय साधेपणाने त्यांनी ही कथा रसिकांसमोर आणली. 20व्या शतकाच्या सुरुवातीचा बंगालमधील हा कालखंड आहे. निश्चिंदपूर येथील एका ग्रामीण भागात एक हरिहर नावाचा गरीब ब्राह्मण राहत असतो. त्याच्यासोबत त्याची पत्नी सर्बजाया, दोन लहान मुले दुर्गा आणि अप्पू तसेच दूरची आत्या राहत असते. हरिहर गावचा पुजारी असतो. कुटुंबाचा आर्थिक भार त्याला पेलवत नसतो. तो कायम आर्थिक विवंचनेत असतो. कर्जाचा मोठा बोजा डोक्यावर असतो. अशा या प्रतिकूल वातावरणातही जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रत्येकाकडे असते. हा सिनेमा तसा एका उमलत्या लहान मुलाच्या भावविश्वाचा वेध घेणारा आहे. हा मुलगा म्हणजे अप्पू आठ वर्षांचा आहे तर त्याची मोठी बहीण दुर्गा 11 वर्षांची आहे. या बहीण-भावंडांमध्ये खूप विलोभनीय असे लोभस नाते आहे. हे दोघे जंगलात जातात, फिरतात. झाडांमध्ये लपतात. आगगाडी पाहतात, गवताशी बोलतात. त्यांच्या गरीबीची त्यांना जाणीव असते, तरीही जगण्याचा आनंद ते घेत असतात. एका दृश्यात गावात एक मिठाईवाला येतो. ही दोन्ही बालके आपल्या घरातून मिठाईवाल्याकडे पाहतात, पण मिठाई घेण्याचे पैसे त्यांच्याकडे नसल्याची जाणीव त्यांच्या चेहऱयावर दिसते. आपल्याकडे अभिजन वर्गाचे संघर्ष फारसे कुणाला मांडता येत नाहीत. पण सत्यजित रे यांनी तो संघर्ष खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. हरिहर हा मेहनत करून सर्वांचे कर्ज फेडणार असतो. त्यासाठी त्याला शहरात जायचे असते. तो स्वाभिमानी असतो. कुणाचेही पैसे त्याला बुडवायचे नसतात किंवा कुणावरही ओझे बनून राहायचे नसते. परिस्थितीला दोष न देता फक्त लढायचे काम सर्वजण करत असतात.
पुढे कथा अनपेक्षित वळण घेते. दुर्गा आजारी पडते आणि त्यातच तिचा अंत होतो. त्याचप्रमाणे हरिहरची आत्या हीदेखील मृत्युमुखी पडते. या दोन अकल्पित आघातानंतर हे घर पुरते हादरते आणि हरिहर दुसऱया शहरात जायला निघतो. गावातील लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो दुसऱया गावी जाण्याचा निर्णय घेतो. छोटा अप्पू हे सर्व पाहात असतो. आपल्या अल्प कुवतीनुसार तो त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. लाडक्या बहिणीचा मृत्यू, आजीचा मृत्यू हे त्याला काही समजत नाही. पण नक्की काहीतरी वेगळे घडल्याचे त्याचे लहानगे डोळे सांगून जातात. फार चांगल्या पद्धतीने सत्यजित रे यांनी हे प्रसंग घेतले आहेत. शेवटी हरिहर त्याची पत्नी आणि लहानग्या अप्पूला घेऊन ते घर सोडतो. आज 70 वर्षांनंतरदेखील हा चित्रपट जागतिक क्रमवारीत का टिकून आहे, आयकॉनिक मूव्ही म्हणून का ओळखला जातो, कारण या सिनेमात मानवी नातेसंबंधाचा भावनिक बंध खूप हळुवारपणे रे यांनी दाखवला आहे. सिनेमाचा प्लॉट बंगालमधला जरी असला तरी जागतिक प्रेक्षक त्याच्याशी कोरीलेट होऊ शकतात. हेच याचे बलस्थान आहे.
हा चित्रपट बनवताना सत्यजित रे यांना फार मोठय़ा आर्थिक संकटातून जावे लागले. कोणीही फायनान्स करायला तयार नव्हते. प्रसंगी त्यांच्या पत्नीने तिचे दागिनेही गहाण ठेवले आहेत. या सिनेमाचा पीन प्ले न लिहिता त्यांनी प्रसंगांची चित्रे काढली आणि निर्माण केला. या सिनेमाला फायनान्स पश्चिम बंगाल सरकारने (तेव्हाचे मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय) केला. या सिनेमाचा प्रीमियर अमेरिकन चित्रपट महोत्सवात झाला. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये याला दोन पुरस्कार मिळाले. जगभरातील अनेक उत्तम पुरस्कार मिळाले. हिंदुस्थानात ‘पाथेर पांचाली’ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार आणि सुवर्ण कमळ मिळाले. या सिनेमाच्या स्पेशल पीनिंगला बंगालचे मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ने हिंदुस्थानी सिनेमाला जागतिक सिनेमाच्या व्यासपीठावर नेले. पुढे सत्यजित रे यांनी याच सिनेमाचे पुढचे दोन भाग काढले. अपराजिता (1956) आणि अपूर संसार (1959). त्यामुळे या तीन सिनेमांना सिनेरसिक अप्पू ट्रायलॉजी म्हणून ओळखतात.
[email protected]
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)





























































