
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्च कंठश्च वाल्मीक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा स्पष्ट उल्लेख यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीतही वाढ होत असून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राजीनामा देणार असल्याची फेसबुक पोस्ट त्यांच्या जवळच्या व्यक्तीने केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
हे वाचा – धनंजय मुंडेंना अजित पवार पाठिशी घालत आहेत, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड हाच असल्याचे सीआयडीने आरोपपत्रात म्हटले आहे. वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत असून ते उद्या सोमवारी राजीनामा देणार असल्याची सूचक पोस्ट करुणा धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मला आतून अशी माहिती मिळाली आहे की अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे आणि 100 टक्के उद्या ते राजीनामा देणार आहेत, असे करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वाल्मीक कराड दोषी आढळल्यास मी राजीनामा देईल असे धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यामुळे आता त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नाही, त्यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे. अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा अजितदादा घेणार आहेत, असेही करुणा मुंडे यांनी सांगितले.