एकाही रहिवाशाला अपात्र करण्याची हिंमत अदानीत नाही! धारावी बचाव आंदोलनाच्या नेत्यांनी ठणकावले

धारावीकरांच्या मनाविरुद्ध धारावी पुनर्विकास प्रकल्प रेटला जात असून अदानीची कंपनी ही जास्तीत जास्त झोपडय़ा, घरांना अपात्र करण्यास निघाली आहे. मात्र, धारावीकरांनी घाबरून जाऊ नये. धारावीतील कोणत्याही रहिवाशाला अपात्र करण्याची हिंमत अदानी कंपनीत नाही. धारावीकरांच्या संरक्षणासाठी ‘धारावी बचाव आंदोलन’ ही संघटना एक मजबूत संरक्षक ढाल म्हणून उभी आहे, असा विश्वास धारावी बचाव आंदोलनाच्या नेत्यांनी दिला.

धारावीकरांचा पुनर्विकास धारावीतच करा, धारावीकरांना 500 चौरस फुटाची घरे, दुकानांच्या बदल्यात दुकाने द्या आणि धारावीचा पुनर्विकास अदानी कंपनीऐवजी राज्य सरकार, म्हाडा किंवा सिडकोने करावा तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत धारावीकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी जनसभा घेतल्या जात आहेत. सोमवारी 90 फूट रोड लगत असलेल्या महात्मा गांधी मैदानावर धारावी बचाव आंदोलनाची विशाल जनसभा झाली. यावेळी बोलताना धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबूराव माने यांनी धारावीकरांना आश्वस्त केले. या जनसभेचे आयोजन माजी नगरसेवक वसंत नकाशे यांनी केले होते. यावेळी शेकापचे अॅड. राजेंद्र कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धारावी अध्यक्ष उल्लेश गजाकोश, आपचे तरुण दास स्वामी, शेकाप विद्यार्थी संघटनेच्या साम्या कोरडे, धारावी बिजनेसमैन वेलफेअर असोसिएशनचे समीर शेख, फजल भाई, रफी उल्ला अन्सारी आदी उपस्थित होते.

असा पुनर्विकास कुठे झाला आहे का?

धारावीकरांचा पुनर्विकास करण्याच्या नावाखाली धारावीतील 550 एकर जागेबरोबर मुलुंड, देवनार, कुर्लासह अशी सुमारे 2 हजार एकरची जागाही अदानी कंपनीच्या घशात घातली जात आहे. हा उघड भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार सरकारच्या मदतीने केला जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासारखा अद्भुत, अद्वितीय असा एकही प्रकल्प जगात झाला आहे का की, ज्यात पुनर्वसनाच्या नावाखाली एवढी जमीन सरकारने एखाद्या बांधकाम कंपनीला दान केली आहे. जगात असे एकही उदाहरण नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा भ्रष्टाचार आहे आणि तो थांबवून गरीब धारावीकरांना इथेच घरे द्या, अशी मागणी बाबूराव माने यांनी सरकारकडे केली.