
दिवाळखोरीत निघालेल्या दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पेरेशन लिमिटेडच्या (डीएचएफएल) खरेदीसाठी नव्याने बोली लागण्याची शक्यता आहे. अदानी ग्रुपने बोली लावण्याची मुदत संपल्यानंतर इतर कंपन्यांच्या तुलनेत जादा बोली लावली आहे. त्यावर इतर खरेदीदार कंपन्यांनी आक्षेप घेतल्याने सर्व प्रक्रिया नव्याने होणार आहे
डीएचएफएलच्या खरेदीसाठी पिरामल एन्टरप्रयझेसने 25 हजार कोटी रुपयांची बोली लावली असून ओक्ट्री या कंपनीने 31 हजार कोटी रुपयांची बोली लावली आहे, तर अदानीने केवळ झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासाठी 2700 कोटी रुपयांची बोली लावली आहे. दरम्यान बोली लावण्याची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर अदानीने पूर्ण डीएचएफएलसाठी ओक्ट्री पेक्षा 250 कोटी रुपयांची जादा बोली लावली आहे. त्यामुळे इतर बोलीदारांमध्ये नाराजी असून नव्याने बोली प्रक्रिया न राबवल्यास कायदेशीर आव्हान देण्याचा इशारा पिरामल एन्टरप्रयझेसने दिला आहे. तसेच अदानीने मुदत संपल्यानंतर बोली लावून लिलाव प्रक्रियेचा भंग केला असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया नव्याने राबवण्याची मागणी करत त्याबाबतचे लेखी पत्र डीएचएफएलच्या कर्जदार असलेल्या एसबीआयला दिले आहे.

























































