धक्कादायक! ढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड शहरानजीकच्या भरणे नाका येथील एका बेकरीमध्ये ढोकळ्याच्या चटणीत मृत बेडूक आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत तक्रार न दिल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र चार दिवसांनी सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. शहरातील एका बेकरीतील पदार्थांमध्ये किडे आढळल्याचा प्रकार ताजा असतानाच हा नवा प्रकार उजेडात आल्याने अन्न औषध प्रशासन विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

तळे येथील ग्राहकाने संबंधीत बेकरीतून चार दिवसांपूर्वी ढोकळा खरेदी केला. तो घरी नेल्यानंतर मुलांना खाण्यासाठी देत असतानाच चटणीमध्ये मृतावस्थेतील बेडूक सापडल्याने त्यांना धक्काच बसला. मात्र त्यांनी याप्रकरणी तक्रार देण्यास टाळाटाळ केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र हा प्रकार व्हायरल झाला. शहरात सर्वत्र चटणीतील बेडकाचीच चर्चा आहे. या निमित्ताने आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बेकरीतील पदार्थ तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाला आता तरी वेळ मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

यापूर्वी बाजारपेठेतील एका बेकरीतून ढोकळा खाल्लेल्या पाचजणांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच भरणे मार्गावरील शिवाजी चौकातील एका बेकरीतील केक मध्ये अळ्या आढळल्या होत्या. याबाबत तपासणीत मुदत संपलेले पदार्थ आढळल्याने बेकरीला सील ठोकले होते. भरणे येथील एका बेकरीतून मंचुरियन मध्ये बँडेज पट्टी आढळल्याचा प्रकार घडला होता.