…म्हणून धोनीने घेतला होता पंचांकडून चेंडू!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘टीम इंडिया’चा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी आता एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले होते. मात्र धोनीच्या निवृत्तीची चर्चा निरर्थक असल्याचे हिंदुस्थान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.  ‘टीम इंडिया’ने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने मैदानाबाहेर जाताना पंचांकडून चेंडू घेतला होता. त्यामुळे धोनी आता निवृत्त होणार या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले होते. कारण हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१४ मध्ये झालेल्या कसोटी सामना संपल्यानंतर धोनीने यष्टी पंचांकडून मागून घेतली होती. त्यानंतर आश्चर्यकारक पद्धतीने त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. याचाच संबंध तिसर्‍या एकदिवसीय सामन्याशी जोडला गेला अन् धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेने जोर धरला. हा सामना संपल्यानंतर धोनीने पंच ब्रुस ऑक्झेनफोर्ड (ऑस्ट्रेलिया) आणि मायकेल गॉफ (इंग्लंड) यांच्याकडून चेंडू मागून घेतला. त्या पार्श्वभूमीवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांना दाखवण्यासाठी धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला होता. धोनीच्या निवृत्तीची चर्चा निरर्थक आहे. तो कुठेच जात नाही.